ठाण्यातील तरुणीच्या अपघात प्रकरणात अश्वजितसह तिघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: December 17, 2023 11:31 PM2023-12-17T23:31:51+5:302023-12-17T23:32:03+5:30
ठाणे एसआयटीची कारवाई, लँड रोव्हरसह दोन वाहनेही जप्त
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्यातील तरुणीच्या अपघात आणि मारहाण प्रकरणात २४ तासांच्या आतच विशेष तपास पथकाने (एसआयटी) अश्वजित गायकवाड याच्यासह रोमिल पाटील आणि वाहन चालक सागर शेडगे (रा. तिघेही, ठाणे) या तिघांना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. अपघातातील लँड रोव्हर डिफेंडरसह दोन वाहनेही जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
पिडित तरुणीची राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्याचवेळी याप्रकरणात कलम ३०७ जोडण्याचीही त्यांनी मागणी केली. अन्यथा अधिवेशनात ठाण्यातील तरुणीचा विषय लावून धरणार असल्याचा इशाराही दिला. दानवे यांच्या या इशाºयानंतर रविवारी सकाळीच पोलिस उपायुक्तांच्या निगराणीखाली स्थापन केलेल्या एसआयटी पथकाने अवघ्या २४ तासांमध्येच चौकशी करुन या प्रकरणात अश्वजीत, चालक सागर शेडगे सह तिघांना अटक केली. त्यांची दोन वाहनेही ताब्यात घेतली असून पुढील तपास करण्यात येत असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.