खवल्या मांजराची विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 12:13 PM2019-10-13T12:13:26+5:302019-10-13T12:13:59+5:30
खवल्या मांजराची विक्री करण्यासाठी खराडी येथे आलेल्या तिघांना चंदननगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
पुणे : खवल्या मांजराची विक्री करण्यासाठी खराडी येथे आलेल्या तिघांना चंदननगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. याप्रकरणी जितेंद्र शिवराम मोहिते (वय 32, रा. श्रीवर्धन, रायगड),योगेश यशवंत पाते(30,रा.दिवे आगार,रायगड), कुमार यशवंत सावंत (46 रा.शिरोळ,कोल्हापूर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चे कलम 2(16),39(ब),9/44/50 व 51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील प्राईड हाॅटेल मागे तिन इसम दुर्मीळ खवल्या मांजराची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती तपास पथकातील पोलिस नाईक तुषार आल्हाट यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी पथकासह सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळ असणाऱ्या एका मोठ्या बॅगेत एक दुर्मिळ खवल्या मांजर मिळून आले. अधिक तपासात या दुर्मिळ खवल्या मांजराची विक्री करण्यासाठी तिघेही पुण्यात आले होते. या तिघांविरुध्द वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार चंदननगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली,सहाय्यक निरीक्षक गजानन जाधव,पोलिस नाईक तुषार आल्हाट,पोलिस हवालदार अजित धुमाळ,राजेंद्र दिक्षीत,श्रीकांत गांगुर्डे,पोलिस नाईक दत्ता शिंदे,अमित जाधव,शकुर पठाण,पोलिस शिपाई परशुराम शिरसाट,सुभाष आव्हाड यांच्या पथकाने हि कामगिरी केली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव करीत आहेत.