वाघ-बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 05:25 PM2021-07-14T17:25:52+5:302021-07-14T17:25:59+5:30

Three arrested for smuggling tiger-leopard claws : त्यांच्याकडून वाघ व बिबट्याची दहा नखे, एक दुचाकी आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यातील

Three arrested for smuggling tiger-leopard claws | वाघ-बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

वाघ-बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

googlenewsNext

बुलडाणा: वाघ व बिबट्याच्या नखांची तस्तकरी करणाऱ्या तीन जणांना वनविभागाने १३ जुलै रोजी नांदुरा येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून वाघ व बिबट्याची दहा नखे, एक दुचाकी आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यातील दोन आरोपी हे जळगाव खान्देशमधील असून एक आरोपी हा बुलडाणा जिल्ह्यातील आहे. अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना १७ जुलै पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकरणाच्या तपासासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती आहे.

दरम्यान, तपासाचा भाग म्हणून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे वनविभागाने गुलदस्त्यात ठेवली आहे. वाघ व बिबट्यांना ठार मारुन त्यांच्या मौल्यवान नखांची तस्करी बुलडाणा जिल्ह्यात होत असल्याची माहिती मुंबई येथील वाईल्ड लाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो आणि अमरावती येथील मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम सेलला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील हनुमान मुर्ती परिसरात वाघ व बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना १३ जुलै रोजी सायंकाळी वनविभागाने सापळा रचून अटक केली.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतातील वाघ व बिबट्याच्या अवयवांची मोठी किंमत मिळत असल्याने या शेड्यूल वन मधील प्राण्यांची शिकार करून त्यांचे अवयव अवैधपणे विकले जातात. त्यामुळे या प्राण्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने वनविभागा व वन्यजीव विभाग अधिक संवेदनशील व सजग आहे. उपरोक्त स्वरुपाची माहिती मिळाल्यानंतर मेळघाट व्याग्र प्रकल्पाच्या क्षेत्रसंचालक तथा मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी व क्षेत्रीय निदेशक वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो (मुंबई) योगेश वरखड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा उप वनसंरक्षक अक्षय गजभीये यांच्या नेतृत्वाखाली नांदुरा येथील हनुमान मुर्ती परिसरात वनविभागाच्या पथकाने १३ जुलै रोजी सापळा रचला. या कारवाईत वाघ व बिबट्याची दहा नखे, एक दुचाकी व तीन मोबाईल जप्त करण्यात त्यांना यश आले. यातील दोन आरोपी जळगाव खान्देशमधील तर एक आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील आहे.

आरोपींना वन कोठडी
अटक करण्यात आलेल्या तीनही आराेपींना नांदुरा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची १७ जुलै पर्यंत वन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक वनसंरक्षक संदीप गवारे (मेहकर), सहाय्यक वन संरक्षक रणजीत गायकवाड (बुलडाणा), मुंबई येथील वाईल्ड लाईफ कंट्रोल ब्युरोचे अदीमलय्या, वन परीक्षेत्र अधिकारी के. डी. पडोळ, स्मीता राजहंस, गणेश टेकाळे, के. आर. मोरे, एस. एच. पठाण, आकाश सारडा, मुकेश जावरकर, जीवन दहीकर, रामेश्वर हाडे यांनी सहभाग घेतला. या वनगुन्ह्याचा तपास बुलडाणा येथील सहाय्यक वनसरंक्षक रणजीत गायकवाड व वनपरीक्षेत्र अधिकारी मोताला हे करीत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती वनविभागातील सुत्रांनी दिली

Web Title: Three arrested for smuggling tiger-leopard claws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.