हडपसर येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खून प्रकरणी तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 02:25 PM2018-11-22T14:25:23+5:302018-11-22T14:29:12+5:30
जेएसपीएम कॉलेजच्या मागील मैदानात काही संशयित असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी बॅटरी चोरी करण्याची पद्धती व चोरांचा वावर यावरून त्यांचा माग काढला.
पुणे : हडपसर येथे ट्रकची बॅटरी चोरताना विरोध करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरचा बॅटरी चोरांनी धारदार शस्त्राने भोकसून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कवडीपाट टोलनाक्याच्या काही अंतरावर द्राक्षबाग संशोधन केंद्रासमोर घडली. याप्रकरणी हडपसरपोलिसांनी तीन सराईत बॅटरी चोरांना गुन्हयाात अटक केलेली आहे.
महेश बबन गजसिंह (वय २२) विजय बाळू सोनवणे (वय १९) दोघे रा. उरळी देवाची,हवेली.चतुरघन मनोहर कळसे (वय २३ रा.कोंढवा,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. या घटनेत दत्तात्रय भोईटे (वय ४२ रा. फलटण,सातारा ) या ट्रक चालकाचा निर्घृण खून करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- सोलापूर रोडवरील द्राक्षबागायदार संघ व टोल नाका परिसरात ट्रक चालक संध्याकाळच्या सुमारास विश्रांतीसाठी थांबलेले असतात. ट्रकचालक झोपेत आहेत याचा फायदा घेऊन यापूर्वी काही बॅटरी चोरीच्या घटनाही त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास तीनही आरोपी एका ट्रकची बॅटरी काढत असताना ट्रकचालक झोपेतून जागा झाला. त्याने बॅटरी चोरांना हटकले असता, बॅटरी चोरांनी त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने भोकसून त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर बॅटरी चोरांनी धूम ठोकली. परिसरातील ट्रक ड्रायव्हरने हडपसर पोलिसांना माहिती कळविताच पोलिसांनी बॅटरी चोरी करण्याची पद्धती व चोरांचा वावर यावरून त्यांचा माग काढला. जेएसपीएम कॉलेजच्या मागील मैदानात काही संशयित असल्याचे पोलिसांना समजले. त्यांना ताब्यात घेतले असता ट्रकचालकाचा खून केल्याचे तिघांनी कबूल केले. सहाय्यक आयुक्त सुनील देशमुख, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार, शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजय चव्हाण, किरण लोंढे, प्रासाद लोणारे उपनिरीक्षक मंगेश भांगे यांनी तपासकामी काम पाहिले.