पिंपळखुटा येथे तीन घरफोड्या; दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 11:10 AM2021-06-20T11:10:43+5:302021-06-20T11:12:54+5:30
Crime News : घरातील लोखंडी कपाट व पेटी मध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने व रोख असा दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
- नासीर शेख
खेट्री (अकोला): पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथे घरफोड्या करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घालून तीन घरफोड्या व एक घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी दिनांक २० जून रोजीच्या सकाळी उघडकीस आल्याने गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भगवंता नाना देशमुख, रामकृष्ण बळीराम कीर्तने, गणेश कृष्णराव देशमुख, यांच्या घरातील चोरणारी टोळीने शनिवारी मध्यरात्री घराच्या द्वाराला लावलेली कडी तोडून आत प्रवेश केला आणि घरातील लोखंडी कपाट व पेटी मध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने व रोख असा दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच डॉक्टर अरविंद पंजाबराव देशमुख, यांच्या घरी चोरीचा प्रयत्न फसला. सदर घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ उपनिरीक्षक गणेश नावकार गणेश महाजन, सुधाकर करवते, दत्ता हिंगणे, यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आहे. शवण व फिंगर पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी अज्ञात चोरणारी टोळी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश नावकार करीत आहे.