पोटच्या तीन मुलींवर नराधम बापाकडून अत्याचार; दोन मुली अल्पवयीन; नालासोपाऱ्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 08:44 IST2025-02-28T08:43:22+5:302025-02-28T08:44:19+5:30
पीडित मुली मूळच्या कोकणातील कणकवली येथे राहणाऱ्या आहेत. मुलींचा बाप असलेला आरोपी हा खंडणी, गोळीबार, तसेच हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे.

पोटच्या तीन मुलींवर नराधम बापाकडून अत्याचार; दोन मुली अल्पवयीन; नालासोपाऱ्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : आपल्या पोटच्या ३ मुलींवर त्यांच्या वडिलांनीच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या मुलींनी नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणातील दोन मुली अल्पवयीन आहेत, तर एक मुलगी २१ वर्षांची आहे. मुलींचा बाप असलेला आरोपी हा खंडणी, गोळीबार, तसेच हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. बुधवारी पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल करत आरोपी नराधम बापाला अटक केली आहे.
पीडित मुली मूळच्या कोकणातील कणकवली येथे राहणाऱ्या आहेत. आरोपी असलेला बाप हा ५६ वर्षीय असून त्याला ५ मुली आहेत. कोकणातील गावी असताना तो या मुलींवर बलात्कार करत होता. यापैकी एका मुलीचा ४ वेळा गर्भपातही करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. अखेर पित्याच्या अत्याचाराला कंटाळून आई पाचही मुलींना घेऊन नालासोपारा येथे एका नातेवाइकाच्या आश्रयाला आली. या ३ मुलींपैकी मोठी मुलगी २१ वर्षांची असून अन्य दोन मुली या अल्पवयीन आहेत. मोठ्या मुलीने याबाबतची फिर्याद दिली आहे. आतापर्यंत वडिलांच्या दहशतीमुळे गप्प बसल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले.
आरोपी बापावर गंभीर गुन्हे
आरोपी बापावर हत्या, खंडणी, गोळीबार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. २००४ मध्ये त्याने एक हत्याही केली होती. फरार आरोपीला अटक केल्याची माहिती नालासोपारा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल वळवी यांनी दिली.
ही घटना गंभीर असून आम्ही मुलींची तक्रार आल्यावर गुन्हा दाखल केला
आहे. आतापर्यंतच्या तपासात ३ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती परिमडंळ तीनचे पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.
पत्नीसह मुलीची हत्या करत आत्महत्या
नालासोपारा : विरारच्या बोळींज पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाने आपल्या पत्नीसह ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलीची गळा दाबून हत्या केली.
त्यानंतर स्वतःसुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ते बुधवारी दुपारी या दरम्यान घडली आहे. बोळींज पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
विरारच्या ग्लोबल सिटीतील मैत्री हाईट्स येथे उदयकुमार काजवा (५२) हे पत्नी विना (४२) आणि मुलगी शिवालिका (५) यांच्यासह राहात होते. अज्ञात कारणावरून उदयकुमार यांनी विना व शिवालिका या दोघींची गळा दाबून हत्या केली आहे. त्यानंतर त्यांनी बेडरूममध्ये गळफास घेतला.