अर्जुन पुरस्कार विजेत्या कारचालकाच्या कारखाली सापडून तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 03:24 PM2019-09-22T15:24:16+5:302019-09-22T15:24:50+5:30
अर्जुन पुरस्कार विजेत्या कारचालकाच्या कारखाली सापडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.
जोधपूर - अर्जुन पुरस्कार प्राप्त कारचालक गौरव गिल याच्या कारखाली सापडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. हा अपघात राष्ट्रीय रॅली चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान गौरव गिल याच्या कारने एका दुचाकीला चिरडले. त्यामुळे झालेल्या अपघातात एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर इंडियन कार रॅलीची जोधपूर फेरी रद्द करण्यात आली आहे.
एफएमएससीआय इंडियन रॅली चॅम्पियनशिप २०१९ च्या तिसऱ्या फेरीत हा अपघात झाला. या अपघातात गौरव गिल हासुद्धा जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्पर्धेदरम्यान, गिल याची कार होतरडा गावाजवळील ट्रॅकवर आली असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला कारची धडक बसली. ही दुचाकी प्रतिबंधित क्षेत्रात घुसली होती. शर्यतीला सुरुवात होण्यापूर्वी ट्रॅकवर न येण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र तरीही ही दुचाकी शर्यत सुरू असलेल्या क्षेत्रात घुसली होती.