ठाणेदाराला लाच देण्याचा प्रयत्न करणारे तीन जुगार माफिया गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 05:06 PM2021-05-22T17:06:36+5:302021-05-22T17:08:34+5:30

अकोला : दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करू देणे तसेच जुगार व वरली अड्डे ...

Three gambling mafias try to bribe Thanedar | ठाणेदाराला लाच देण्याचा प्रयत्न करणारे तीन जुगार माफिया गजाआड

ठाणेदाराला लाच देण्याचा प्रयत्न करणारे तीन जुगार माफिया गजाआड

Next
ठळक मुद्देअकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई जिल्ह्यातील दुसरा रिव्हर्स ट्रॅप

अकोला : दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करू देणे तसेच जुगार व वरली अड्डे चालू करण्यासाठी दहीहांडा ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी परवानगी द्यावी, यासाठी त्यांना ५० हजार रुपयांच्या लाचेचे आमिष देऊन त्यापैकी २५ हजार रुपयांची लाच देत असताना ३ जुगार माफियांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अटक केली. या कारवाईने दहीहंडा पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. राज्यातील हा दुर्मीळ रिव्हर्स ट्रॅप असल्याची माहिती असून, अकोला जिल्ह्यातील दुसरा रिव्हर्स ट्रॅप असल्याचे वृत्त आहे.

दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तसेच देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या होत असलेली विक्री बंद केली. त्यामुळे त्यांना लाच देण्याचे आमिष देऊन हे गोरखधंदे पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न काही जुगार माफियांनी केला होता; मात्र ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या तत्त्वांना हे पटणारे नसल्याने त्यांनी या माफियांची टाळाटाळ केली; मात्र तरीही ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्यावर राजकीय दबाव आणून धंदे सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी जुगार माफिया लाचेचे आमिष देत असल्याची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० आणि २१ मे रोजी पडताळणी केली असता शिवा गोपाळराव मगर (वय ३०), अभिजित रविकांत पागृत (३१, दोघे, रा. आकोट) व घनश्याम गजानन कडू (रा. लोतखेड, ता. अकोट) हे तिघे अवैध धंदे सुरू करण्यासाठी ५० हजार रुपये लाच देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले. त्यानंतर २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता घेऊन हे तिघे शनिवारी पहाटे दहीहांडा पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी सापळा रचून असलेल्या अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीनही जुगार माफियांना २५ हजारांची लाच देत असताना रंगेहाथ अटक केली. या जुगार माफियांविरुद्ध दहीहंडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शरद मेमाने व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.

 

 

 

 

 

Web Title: Three gambling mafias try to bribe Thanedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.