तीन तडीपार गुंडांना शस्त्रासह अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 05:11 PM2019-09-04T17:11:46+5:302019-09-04T17:12:26+5:30
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही करण्यात आली..
पुणे : शहर व जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही शहरात राहणाऱ्या तिघा गुंडांना पोलिसांनी घातक शस्त्रासह अटक केली आहे़.
अजिंक्य सुरेश शिंदे (वय २२, रा़ लोहियानगर) याला तडीपार केल्यानंतरही तो शहरात असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार त्याला रविवार पेठेतील पागा गणेश मंदिराजवळ घातक शस्त्रासह पकडण्यात आले़. त्याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये खुनाचा प्रयत्नाचा एक तसेच खडक पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, विनयभंग, अंमली पदार्थ जवळ बाळगल्याबद्दल असे ५ गुन्हे दाखल आहेत़. त्याला २१ मार्च २०१७ पासून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते़.
गंग्या ऊर्फ विक्की विष्णु आखाडे (वय २२, रा़ वारजे माळवाडी) याला वारजे येथील म्हाडा कॉलनीत पकडण्यात आले़. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडाचे प्रत्येकी एक व गंभीर दुखापतीचे दोन असे ४ गुन्हे दाखल आहेत़. त्याला २ एप्रिल २०१९ पासून एक वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असताना तो शहरात वावरत होता़.
सराईत गुंड सोमनाथ नवनाथ अवघडे (वय २१, रा़. केळेवाडी, कोथरुड) याला केळेवाडी येथे कोयत्यासह पकडण्यात आले़. त्याच्याविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत असे दोन गुन्हे दाखल आहेत़. त्याच्यावर १ सप्टेंबर २०१९ रोजी कारवाई करण्यात आली होती़. न्यायालयाने त्याला गणेशोत्सव काळात स्थान पोलीस ठाण्याच्या हद्दीत न राहता स्वत:चे वर्तन चांगले ठेवून इतर ठिकाणी राहण्यास जावे असा आदेश दिला होता़. तरीही न्यायालयाच्या आदेशाचा भंग करुन केळेवाडीत आढळून आला़.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, हिमालय जोशी व गुन्हे युनिट ३ पथकातील कर्मचारी प्रविण तापकीर, संदीप तळेकर, अतुल साठे, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा, रामदास गोणते, मच्छिंद्र वाळके, रोहिदास लवांडे, शकील शेख, राहुल घाडगे, दत्तात्रय गरुड, दीपक मते, संदीप राठोड यांनी केली़.