एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 21:25 IST2020-09-08T21:23:42+5:302020-09-08T21:25:32+5:30
तिघांविरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद (युपीए), कट रचणे, तसेच इतर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी
पुणे : एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पुण्यातून कबीर कला मंचचे कार्यकर्ती ज्योती जगताप हिच्यासह सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना अटक केली. बंदी असलेल्या मोओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन सागर तात्याराम गोरखे (वय ३२, रा़ वाकड), रमेश मुरलीधर गायचोर (वय ३६, रा़ येरवडा) ज्योती राघोबा जगताप (वय ३३, रा़ कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तिघांचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभाग असून फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे याच्या संपर्कात ते आले होते़ गडचिरोलीतील जंगलात त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. एल्गार परिषदेच्या आयोजनात त्यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
तिघांविरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद (युपीए), कट रचणे, तसेच इतर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे़ पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी दोषारोपपत्रदाखल केले होते. त्यानंतर एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे़ या प्रकरणात एनआयएने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा, प्रा. हनी बाबु यांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात गोरखे, गायचोर, जगताप यांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले़ शहरी भागात मोओवादी विचारधारेचा प्रसार करणारे मिलिंद तेलतुंबडे यांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिघांना एनआयएने अटक केली. मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात मंगळवारी तिघांना हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवस एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.