अंबिकापूर-चितोडा येथे तुंबळ हाणामारी; चाकू हल्ल्यात तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 08:26 PM2021-06-19T20:26:06+5:302021-06-19T20:26:13+5:30
Three injured in knife attack : अंबिकापूर-चितोडा येथे शनिवारी सकाळी जुन्या वादातून तुंबळ हाणामारी झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: तालु्यातील अंबिकापूर-चितोडा येथे शनिवारी सकाळी जुन्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही गटाकडून शस्त्राचा वापर झाल्याने तिघे जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेच्या संतापातून गावात काही वाहने पेटविण्यात आलीत. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. त्यानंतर आता गावात तणावपूर्ण शांतता आहे.
खामगाव तालुक्यातील अंबिकापूर-चितोडा येथील हिवराळे आणि वाघ कुटुंबियांमध्ये साधारणपणे महिनाभरापासून जुना वाद सुरू आहे. शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास दोन्ही कुटुंबात पुन्हा वाद उफाळून आला. यात दोन्ही गटाकडून शस्त्राचा वापर झाल्याने तिघे जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्याला सुरूवातीला खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने, पुढील उपाचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले. रमेश हिवराळे (३५) असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव असून, यावेळी झालेल्या मारहाणीत आशाबाई गौतम हिवराळे (६१), अर्पिता कैलास हिवराळे (१८) या दोघीही जखमी झाल्यात. या घटनेनंतर गावातील काहीकाळ गावातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले.
वाघ यांचे ट्रॅक्टर पेटविले!
- तुंबळ हाणामारी, चाकू हल्ल्यानंतर सागर दिनकर वाघ यांच्या मालकीचे ट्रॅक्टर आणि मालवाहू वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर हे वाहन पेटविण्यात आले. परिणामी, चितोडा-अंबिकापूर येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार रफिक शेख घटनास्थळ दाखल झाले.
गावात चोख पोलिस बंदोबस्त
- घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गावात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दोन्ही कुटुंबामध्ये काही दिवसांपूर्वी आपसात समजोता करण्यात आला होता. मात्र, शनिवारी वादाचे पर्यवसन भांडणात झाले.