Crime News: बापरे! चौघांकडून तीन किलो सोने, २७ किलो चांदी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 07:35 AM2022-03-06T07:35:38+5:302022-03-06T07:35:51+5:30
सव्वा दोन कोटींच्या मुद्देमालासह रेल्वे सुरक्षा बलाने आवळल्या मुसक्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : बल्लारशाह रेल्वेस्थानकावर सकाळी म्हैसूर ते दरभंगाकडे जाणाऱ्या १२,५७८ या दरभंगा बागमती एक्स्प्रेसमध्ये चार संशयित युवकांना ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्यांच्याजवळ तब्बल ३ किलो ७१० ग्रॅम सोने (किमत १ कोटी ७६ लाख ८३१ रुपये), २७ किलो चांदी (किंमत १९ लाख ५८ हजार ४० रुपये) व १४ लाख ५२ हजार १०० रुपये रोख असा एकूण तब्बल २ कोटी १० लाख ६७ हजार ९७१ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेले चारही आरोपी बिहार राज्यातील आहेत.
महताब आलम अयुब खान (३७), बदरुल जहाँगीर खान (२०), मोहम्मद सुभान अब्दुल वाहिब (३०) व दिलकस मोहम्मद आरीफ (२०, सर्व रा. अरेरिया) अशी आरोपींची नावे आहेत. तामिळनाडू त्रिपूर येथे एका सोन्या-चांदीच्या दुकानात दरोडा घालून चार युवक दरभंगा बागमती एक्स्प्रेसने दरभंगाकडे पळून जात असल्याची माहिती बल्लारशाह रेल्वे सुरक्षा बलाने वरिष्ठ सुरक्षा आयुक्त नागपूर यांच्याकडून वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांना मिळाली. या आधारावर ही रेल्वेगाडी बल्लारशाह रेल्वेस्थानकावर येताच सापळा रचून करण्यात आली.
प्लॅटफार्म क्रमांक ५ वर हे चारही आरोपीला बोगी क्रमांक ७, ९ व एसी बोगी क्रमांक ३ मधून प्रवास करीत होते. पकडले जाऊ नये, म्हणून त्यांनी मुद्देमाल वेगवेगळ्या बोगींमध्ये सीटखाली बॅग्ज व गोणींमध्ये लपवून ठेवला होता. ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक महेंद्रकुमार मिश्रा, नवीनप्रताप सिंग, उपनिरीक्षक प्रवीण महाजन, प्रवीण गाडवे, सहायक डी. के. गौतम, राम लखन, तसेच रामवीर सिंग, डी. एच. डुबल आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. यावेळी एक आरोपी पळून जात होता. त्याला धावून शिताफीने पकडले. हा सगळा प्रकार रेल्वेतील स्थानकावरील प्रवासी बघत होते.
आरोपींना तामिळनाडूकडे सुपूर्द करणार
हे सर्व आरोपी त्रिपूर येथे दरोडा घालून बिहारकडे दरभंगा बागमती एक्स्प्रेसने पळून जात होते. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींची ओळख पटताच त्रिपूर पोलिसांनी सूत्र हलविले. यानंतर पोलीस आरोपींच्या मागावर होते. दरम्यान, हे चारही आरोपी दरभंगा एक्स्प्रेसने जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली. त्यांना आता तामिळनाडू पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.