दुधोंडीत जमावाकडून तिघांची हत्या, चौघे जखमी, आठजणांवर गुन्हे, सहाजण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 11:10 AM2021-08-02T11:10:24+5:302021-08-02T11:13:34+5:30
Crime News: दुधोंडी (ता. पलूस) येथील वसंतनगर भागात रविवारी दुपारी एका जमावाने धारदार शस्त्राने वार करून तिघांची हत्या केली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले आहेत.
पलूस (जि. सांगली) : दुधोंडी (ता. पलूस) येथील वसंतनगर भागात रविवारी दुपारी एका जमावाने धारदार शस्त्राने वार करून तिघांची हत्या केली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अरविंद बाबूराव साठे (६०), सनी आत्माराम मोहिते (४०) व विकास आत्माराम मोहिते (३६) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत स्वप्निल साठे, दिलीप साठे, संग्राम मोहिते, आकाश मोहिते हे चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी जिल्ह्यातून पोलिसांची कुमक पाठविण्यात आली असून, या घटनेने दुधोंडी परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. चाकू, गुप्ती, काठ्यांसह अन्य धारदार शस्त्रे व दगडांचाही वापर करून हल्ला करण्यात आला. तासभर ही धुमश्चक्री सुरू होती. दुचाकी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी प्रवीण विलास मोहिते, आदित्य विलास मोहिते, हिम्मत मधुकर मोहिते, विजय मधुकर मोहिते, किशोर प्रकाश मोहिते, वनिता विलास मोहिते, संगीता मधुकर मोहिते, मधुकर धोंडिराम मोहिते या संशयितांची नावे समोर आली आहेत. यातील सहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत कुंडल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद झाला होता. याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल झाली होती. रविवारी दुपारी यातील काहीजण पोलीस ठाण्याकडे जात असताना संशयित प्रवीण मोहिते, आदित्य मोहिते, हिम्मत मोहिते, विजय मोहिते, किशोर मोहिते, वनिता मोहिते, संगीता मोहिते, मधुकर मोहिते यांनी आमच्याच लोकांना तुम्ही मारहाण करून खोटी तक्रार का दिली, अशी विचारणा करीत दुसऱ्या गटातील लोकांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत संशयितांनी धारदार शस्त्रे, लोखंडी पाइप, काठ्यांनी मारहाण केली. यात सनी मोहिते, अरविंद साठे, विकास मोहिते यांच्या छाती, पोटावर वर्मी घाव लागल्याने अतिरक्तस्राव झाला. आरोपींनी लगेच पलायन केले. सर्व जखमींना स्वप्निल साठे व त्यांच्या मित्र, नातेवाइकांनी दुचाकीवरून पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सनी मोहिते, अरविंद साठे, विकास मोहिते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस प्रमुखांकडून पाहणी
पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. येथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांनी घटनेची माहिती घेतली. पत्रकारांशी बोलताना गेडाम म्हणाले की, यात आठ संशयितांची नावे समोर आली असून, सहाजणांना ताब्यात घेतले आहे. दोघे सध्या उपचार घेत आहेत. त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल.