कामगाराने लांबवली दालमिलमधून पावणे तीन लाखाची डाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 08:20 PM2020-11-09T20:20:03+5:302020-11-09T20:20:25+5:30
अटक : ९७ गोण्या केल्या होत्या लंपास
जळगाव : औद्योगीक वसाहत परिसरातील रिद्धी-सिद्धी दालमिलमधून कामगारानेच पावणे तीन लाखाच्या हरभरा डाळीच्या ९७ गोण्या लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी मिश्रीलाल शिवलाल जावरकर (४२, रा. रायपुर, ता.खालवा जि.खंडवा) याला सोमवारी सकाळी अटक केली. चोरलेली डाळ बाहेर गावी विक्री केली असून त्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.
अयोध्यानगरातील रहिवासी प्रकाश शांतीलाल जोशी (वय४७) यांची औद्योगीक वसाहत व्ही सेक्टर मध्ये रिद्धी सिद्धी दालमिल आहे. दर शनिवारी दालमिलमध्ये शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मालाची मोजणी करुन छाटणी होते. १७ ऑक्टोबर रोजी सर्व मालाची मोजणी करण्यात आली होती. प्रकाश जोशी ३१ ऑक्टोबरला बाहेरगावी गेल्याने दालमिलमध्ये ७ कामगार नेहमी प्रमाणे कार्यरत होते. शनिवार ७ नोहेंबर रोजी जोशी परत आल्यावर त्यांनी कंपनीत येणाऱ्या व जाणाऱ्या मालाची माहिती घेतली. प्रकाश जोशी व त्याचा मित्र योगेश पाटील माल मोजत असतांना त्यांना शटरला लागून असलेला पत्रा वाकवलेल्या स्थितीत आढळून आला. सर्व कामगारांना बोलावून डाळीचे पोते मोजून घेतल्यावर तब्बल हरभरा डाळीचे ९८ पोती कमी भरली. चोरट्यांनी दालमिलच्या शटर शेजारील पत्रा वाकवून चोरी केल्याचे आढळून आल्याने प्रकाश जोशी यांनी रविवारी एमआयडीसी पेालिसांत धाव घेतली. चोरट्यांनी २ लाख ७४ हजार ४०० रुपयांचे ९८ पोते डाळ चोरीला गेल्याप्रकरणी जोशी यांनी तक्रार दिली. दरम्यान, रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रतिलाल पवार यांच्या पथकाने जावरकर याला अटक केली. न्या.सुवर्णा कुळकर्णी यांनी त्याला १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.