किडनी डोनेट केल्यावर तुला देखील ४ करोड रुपये मिळतील; अशी बतावणी करून लुबाडले ३ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 07:31 PM2021-08-09T19:31:45+5:302021-08-09T19:38:13+5:30
Fraud Case :फिर्यादी कल्पना मगर ह्या अंबरनाथच्या म्हाडा कॉलनी परिसरात राहत असून त्यांची दिल्लीत राहणाऱ्या रबीना वादी या महिलेसोबत फेसबुकवर मैत्री झाली होती.
अंबरनाथ: दिल्लीतील एका महिलेने अंबरनाथच्या एका महिलेला किडनी डोनेटच्या नावावर तीन लाखाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कल्पना मगर ह्या अंबरनाथच्या म्हाडा कॉलनी परिसरात राहत असून त्यांची दिल्लीत राहणाऱ्या रबीना वादी या महिलेसोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. त्या दोघी फेसबुकवर एकमेकांशी चर्चा करीत होत्या. यावेळी कल्पना मगर यांनी त्यांच्या कौटुंबिक समस्येबाबत रबीना यांच्यासोबत चर्चा केली होती.
आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचे कल्पना यांनी सांगितले. त्यावेळेस रबीना यांनी देखील त्यांची परिस्थिती पूर्वी कमकुवत असल्याचे सांगून आता आपण खूप सुखात असल्याचे सांगितले. रविना यांनी त्यांची एक किडनी चार करोड रुपयांमध्ये डोनेट केल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर कल्पना यांनादेखील किडनी डोनेट करण्याचा सल्ला दिला. किडनी डोनेट केल्यावर तुला देखील चार करोड रुपये मिळतील आणि तुझे आयुष्य सुखद होईल असा बनाव तयार केला.
कल्पना मगर देखील या चार करोड रुपयांच्या आमिषाला बळी पडल्या. त्यासाठी काय करावे लागेल याची चौकशी केली असता रबिना यांनी कल्पना यांना डिपॉझिट स्वरूपात दहा लाख रुपये भरावे लागतील आणि किडनी डोनेट झाल्यानंतर तुम्हाला चार करोड रुपये मिळतील असे आश्वासन दिले. लबीना यांच्या मोहाला बळी पडून कल्पना यांनी तीन लाख रुपये पंजाब नॅशनल बँकेच्या नवी दिल्ली शाखेत जमा केले. मात्र किडनी डोनेटची प्रक्रिया पुढे सरकत नसल्याने कल्पना यांनी रबीना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिच्यासोबत संपर्क तोडला. अखेर कल्पना यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत रबिना वादी आणि अरविंद कुमार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.