'मल्टी नॅशनल कंपनीत इंजिनिअर, करोडोंचा बंगला...' बॉयफ्रेंडसोबत ड्रग्ज विकताना तरुणीला अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 01:01 PM2023-03-14T13:01:03+5:302023-03-14T13:01:24+5:30
पूजा गुप्ता असे आरोपी तरुणीचे नाव असून ती एका मल्टी नॅशनल कंपनीत काम करते.
उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर जिल्ह्यातील फेज थ्री पोलिसांनी एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीसह तिघांना अटक केली आहे. हे सर्वजण रेव्ह पार्टी, पब आणि बारमध्ये विदेशी ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तिघांकडून 289 एमडीएमए गोळ्या जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या गोळ्यांची अंदाजे किंमत 25 लाख रुपये आहे. तसेच, या तिघांच्या म्होरक्यासह तीन आरोपी फरार आहेत. पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे.
दरम्यान, पूजा गुप्ता असे आरोपी तरुणीचे नाव असून ती एका मल्टी नॅशनल कंपनीत काम करते. यासोबतच तिचा बॉयफ्रेंड अभिषेक चौहान आणि पुलकित कपूर यांनाही अटक करण्यात आली आहे. नोएडा सेंट्रलचे डीसीपी राम बदन यांनी सांगितले की, तिन्ही आरोपी विदेशी सिंथेटिक ड्रग्स एमडीएमए गोळ्यांचा वापर आणि पुरवठा करत होते. आरोपींच्या सुचनेवरून पोलिसांनी सेक्टर-61 मध्ये असलेल्या पूजा गुप्ताच्या कोठीवर छापा टाकला. याठिकाणी तपासानंतर विदेशी ड्रग्ज रॅकेटचा खुलासा झाला.
या तिघांचा म्होरक्या सूर्यांश असून तो त्यांना ड्रग्जचा पुरवठा करत होता. सूर्यांशकडून पुलकित कपूर ड्रग्ज घेऊन पूजा आणि अभिषेकला देत होता. त्यानंतर ग्राहक पूजाच्या घरातून वैयक्तिक खरेदी करायचे आणि रेव्ह किंवा इतर पार्ट्यांमध्ये वापर करत होते. तसेच, ही टोळी ऑनलाइन लोकांना सिंथेटिक ड्रग्जचा पुरवठा करत होती. सूर्यांश इतका हुशार होता की, पोलिसांना संशय येऊ नये, यासाठी तो बीएमडब्ल्यू कारमधून कुरिअर पॅकेटमध्ये ड्रग्ज आणून नोएडाला पोहोचवत होता.
वडील रेल्वेत, आई डॉक्टर आणि स्वत: मल्टीनॅशनल कंपनीत
डीसीपी राम बदन यांनी सांगितले की, पूजा गोरखपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे वडील रेल्वेत अभियंता आहेत, तर आई एमबीबीएस डॉक्टर आहे. पूजाने कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक केले आहे. बी.टेक पूर्ण केल्यानंतरच ती नोएडाला आली आणि नोकरी करू लागली. यानंतर नोएडामध्ये राहण्यासाठी तिच्या पालकांनी एक बंगला खरेदी केले. हा बंगला सेक्टर-61 सारख्या पॉश भागात होते. या बंगल्यात पूजाने अगदी नोकरांनाही घरी कामासाठी ठेवले होते. पूजा स्वतः एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होती. तिच्याकडे लाखांचे पॅकेज होते.