सत्संगामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने पळविले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:38 PM2019-04-17T17:38:08+5:302019-04-17T17:39:29+5:30
महानुभव संतसत्संगांमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने पळवुन नेल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे आहे...
लोणी काळभोर : टिळेकरवाडी ( ता. हवेली ) येथील महानुभव संतसत्संगांमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने पळवुन नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात राजेंद्र दत्तात्रय खेडेकर ( वय ४१, रा. कोरेगाव मुळ, इनामदार वस्ती ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. राजेंद्र खेडेकर व त्यांचे मित्र हरिभाऊ कांचन, इंद्रभान लोणकर, संजय भोसले व शामराव सावंत यांनी लोणकर वस्ती, टिळेकरवाडी येथे महानुभाव संतसत्संगांचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम २२ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान होत आहे.
या सत्संगांमध्ये सहभागी होण्यासाठी जाधववाडी, ( ता. जुन्नर ) येथील श्री देवदत्त आश्रममधील १ हजार ५०० साधु संत व ५१ मुले आली आहेत. संत श्री जयेश मुनी अंकुलनेरकर ( वय.४३ ) हे या ५१ मुलांना अध्यात्मिक शिक्षण देऊन त्यांची देखरेख करतात. या कार्यक्रमासाठी १२ एकर जागेत मंडप टाकण्यात आला आहे. तेथेच या सर्वांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ११ एप्रिल पासून ५१ मुलांपैकी ३ मुले बेपत्ता आहेत.
केशव राजेंद्र पटेल ( वय.१४, सध्या रा. जाधववाडी, जुन्नर, मुळ गाव बामखेडा, ता. शहादा, जि. नंदूरबार ), शुभम बाळासाहेब बोरगे ( वय.१५, सध्या रा. जाधववाडी, जुन्नर, मुळ गाव खेपडी, ता. सिन्नर, जि. नाशिक ) व गोपीचंद नरेंद्रमुनी अंकुलनेरकर ( वय १४, सध्या रा. जाधववाडी, जुन्नर, मुळ गाव तुडका, ता. तुमसर, जि भंडारा ) या तीन अल्पवयीन मुलांना पळवुन नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करत आहेत.