गुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत नव्याने तीन गुन्हे नोंद; पोलीस तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 06:24 AM2020-07-28T06:24:03+5:302020-07-28T06:24:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ठाणे, मुंबई, पुणे येथील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या गुडविन ज्वेलर्स बंधूंविरुद्ध मुंबईत एल.टी. मार्ग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ठाणे, मुंबई, पुणे येथील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या गुडविन ज्वेलर्स बंधूंविरुद्ध मुंबईत एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात नव्याने ३ गुन्हे नोंद झाले. यात एकूण ७ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दादर येथील नीलेश सोहनलाल शोभावत (४८) यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे झवेरी बाजारात ज्वेलर्सचे दुकान आहे. २०१५ मध्ये दागिन्यांच्या प्रदर्शनादरम्यान गुडविन ज्वेलर्सच्या सुधीरकुमार मोहनन अकाराकरण आणि सुनीलकुमार मोहनन अकाराकरण यांची भेट झाली. त्यांनी संपूर्ण भारतात दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय होत असून, दागिने आवडल्याचे सांगून व्यवहार करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार २०१६ पासून व्यवहार सुरू झाला. सुरुवातीला पैसे मिळत असल्याने त्यांनी उधारीवर दागिने देण्यास सुरुवात केली. याचदरम्यान १० आॅक्टोबर २०१९ रोजी एक कोटी किमतीचे दागिने दिले. मात्र त्याचे पैसे दिले नाही. यातच, गुडविन ज्वेलर्सने वेगवेगळ्या ज्वेलर्सकडून घेतलेल्या मालाचे पैसे दिले नसल्याने त्यांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा दाखल झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. पैसे परत मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठून पत्र दिले आहे.
परेलचे सराफ भरत ललित मेहता आणि चिंचपोकळीचे प्रवीण राठोड यांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे. मेहता यांची २ कोटी ६५ लाख तर राठोड यांची ३ कोटी ३४ लाखांना फसवणूक झाली. दोघांचेही झवेरी बाजारात ज्वेलर्सचे दुकान आहे.
अकाराकरण बंधू मुंबई, ठाणे, पुणे, केरळ येथील २२ शाखा बंद करून पसार झाले होते. मुंबई, ठाणे, पुण्यात गुन्हे नोंद झाल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. आता त्यांच्यावर नव्याने गुन्हे नोंद झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.