15 लाखांच्या कोकेनसह तीन नायझेरियन अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 05:06 PM2018-09-05T17:06:04+5:302018-09-05T17:13:34+5:30
चुकवू फिलिप्स गॉडवीन( वय ३२), चुकावे मेका डेनियल अजाह (वय २४) आणि मायकल ओगवन्ना कौसी (वय - २२) हे तिघेजण त्या परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी आले होते.
मुंबई - मालाडच्या मालवणी परिसरात येत असलेल्या नायझेरियन तस्करांची माहिती मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक फटांगरे यांना मिळली होती. त्यानुसार मालवणी येथील राठोडी गावात पोलिस या तस्करांवर साध्या वेशात नजर ठेवून होते. त्यावेळी चुकवू फिलिप्स गॉडवीन( वय ३२), चुकावे मेका डेनियल अजाह (वय २४) आणि मायकल ओगवन्ना कौसी (वय - २२) हे तिघेजण त्या परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी आले होते. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना तब्बल 152 ग्रॅम कोकेन मिळून आले ज्याची बाजारात किंमत ही 15 लाख २० हजार रुपये इतकी आहे. हे कोकेन शहरातील उच्चभ्रू वस्तीतील तरुणांसाठी त्यांनी आणल्याची कबूली दिली आहे.
फोनवरून संपर्क करून हे तस्कर त्यांना अमली पदार्थ घेण्यासाठी निर्जनस्थळी बोलवत असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस अधिक तपास करत आहेत. चुकावे मेका डेनियल अजाह हा मालवणीत राहणार असून अन्य दोन आरोपी हे नायजेरियन असल्याचे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितले. नशेचा अमल शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचवणाऱ्या नायझेरियन तस्करांमुळे पोलिसांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतच आहे. अलीकडेच तस्करांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनाच दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विभागाने आता या नायझेरियन तस्करांची धरपकड सुरू केली आहे. मालवणी पोलिसांनी तीन नायझेरियन तस्करांना अटक केली असून त्याच्याजवळून पोलिसांनी सुमारे 15 लाख २० हजार किंमतीचे152 ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. मागील पाच महिन्यांत पोलिसांना 11 परदेशी तस्करांना अटक करण्यात यश आलं आहे.