तीन कार्यालये फोडून चोरट्यांनी केली १ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 06:38 PM2018-10-19T18:38:22+5:302018-10-19T18:38:39+5:30
या चोरी प्रकरणाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांना संपर्क केला असता या प्रकरणात तपास चालू असल्याची माहिती त्यांनी दिली.
वास्को - वास्को शहरातील एकाच इमारतीमध्ये असलेल्या तीन कार्यालयात घुसून अज्ञात चोरट्यांनी येथील १ लाख ३४ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना आज सकाळी उघड झाल्याने वास्को शहरात खळबळ माजली आहे. गोवा शिपयार्ड परिसराच्या जवळ असलेल्या ‘कर्मा हाइट्स’ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील तीन जहाज व्यावसायिकांच्या कार्यालयात या अज्ञात चोरट्यांनी प्रमुख दरवाजाचे टाळे तोडून तसेच खिडकीचे गंज कापून आत प्रवेश केल्यानंतर येथे असलेली रोख रक्कम लंपास केल्याची माहीती वास्को पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास या चोरीचा प्रकार उघडकीस आला. ‘कर्मा हाइट्स’ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ‘विलीयमसन मरीटाईम सर्व्हिस’, ‘शेख राणा अॅण्ड संन्स’ व ‘आयएसएस शिपिंग इंडिया प्रा.लि’ या व्यवस्थापनाचे कर्मचारी कामावर आले असता त्यांना येथे चोरीचा प्रकार घडल्याचे आढळून आले. या अज्ञात चोरट्यांनी एका कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे टाळे तोडून आत प्रवेश केला तर इतर दोन कार्यालयात खिडकीचे गंज कापून प्रवेश केल्याचे पोलिसांना तपासणीच्यावेळी जाणविले. विलीयम्सने या कार्यालयातून चोरट्यांनी ६० हजार रुपयांची रोख रक्कम तर शेख राणा अॅण्ड संन्स कार्यालयातून ७४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे पोलीसांना तपासाच्या वेळी जाणविले. आयएसएस शिपिंग कार्यालयात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, मात्र येथून त्यांनी काहीचे नेले नसल्याचे पोलीसांना तपासाच्या वेळी उघड झाले.
काल रात्री ८.३० वाजताच्या सुमारास सदर इमारतीतील कार्यालये बंद झाल्यानंतर आज सकाळी येथील कर्मचारी ती उघडण्यासाठी आले असता या चोरीचा प्रकार समोर आला असून मध्यरात्रीच्या दरम्यान सदर अज्ञात चोरट्यांनी या कार्यालयात हात साफ केला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान चोरी झालेल्या या कार्यालयात लॅपटॉप व इतर काही सामग्री होती, मात्र या चोरट्यांनी फक्त रोख रक्कम लंपास करण्यास पसंत केल्याचे पोलिसांना तपासणीच्या वेळी जाणवले. या चोरी प्रकरणाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांना संपर्क केला असता या प्रकरणात तपास चालू असल्याची माहिती त्यांनी दिली.