गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अखिल भारतीय सेनेच्या मावळ तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 07:02 PM2019-05-22T19:02:26+5:302019-05-22T19:03:59+5:30
आरोपींकडून दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
पिंपरी : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. कुख्यात गुंड अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या मावळ तालुकाध्यक्षाचा यात समावेश आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या वतीने मंगळवारी (दि. २१) ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरण बाळासाहेब ठाकर (वय २६, रा. दारुंब्रे, ता. मावळ), प्रदीप शिवाजी खांडगे (वय २८, रा. पांगरी, ता. खेड, जि. पुणे) आणि राजू शिवलाल परदेशी (वय ५९, रा. दत्तवाडी, कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) यांना अटक केली आहे.
पोलीस कर्मचारी गणेश सावंत माहिती मिळाली की, आळंदी येथे केळगाव रोडवर एक जण पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार सापळा लावून चरण ठाकर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. त्याच्याकडे चौकशी केली असता प्रदीप खांडगे याच्याकडून पिस्तूल विकत घेतल्याने त्याने सांगितले. शोध घेऊन प्रदीप खांडगे यालाही अटक करण्यात आली. मध्यप्रदेशातून दोन पिस्तूल आणल्याचे प्रदीप खांडगे याने चौकशीदरम्यान सांगितले. त्यातील एक पिस्तूर चरण ठाकर आणि एक पिस्तूल राजू परदेशी यांना विकल्याचे प्रदीप खांडगे याने सांगितले. त्यानुसार राजू परदेशी याला अटक करून त्याच्या घरातून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
आरोपी चरण बाळासाहेब ठाकर याच्याविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या अखिल भारतीय सेनेचा तो मावळ तालुकाध्यक्ष आहे. प्रदीप खांडगे याच्यावरही गुन्हा दाखल आहे.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सहायक फौजदार प्रमोद वेताळ, प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, सावन राठोड, अमित गायकवाड, सचिन उगले, प्रवीण पाटील, विशाल भोईर, गणेश सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.