मृतदेहाचा हात बाहेर आल्याने तिघे जेरबंद; जाचाला कंटाळून मालकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 06:20 AM2023-04-14T06:20:50+5:302023-04-14T06:20:59+5:30
मालकाच्या त्रासाला कंटाळून नोकराने दाेन साथीदारांच्या मदतीने मालकाची हत्या केली.
कल्याण :
मालकाच्या त्रासाला कंटाळून नोकराने दाेन साथीदारांच्या मदतीने मालकाची हत्या केली. हत्या केल्यानंतर मालकाचा मृतदेह पुरला. त्यावर मेलेल्या म्हशीचा मृतदेह ठेवला. मात्र, दोन दिवसांनी पुरलेला मृतदेह फुगून मृतदेहाचा हात बाहेर आला आणि हत्येचा उलगडा झाला. टिटवाळा पाेलिसांनी हत्या करणाऱ्या नाेकरासह त्याच्या दाेन साथीदारांना अटक केली आहे. मालकाची हत्या करणाऱ्या नाेकराचे नाव सुनील माैर्या आहे तर त्याच्या साथीदाराची नावे शुभम गुप्ता आणि अभिषेक मिश्रा अशी आहेत. हत्या झालेल्या मालकाचे नाव सचिन माम्हाणे असे हाेते.
टिटवाळा परिसरात राहणाऱ्या सचिनच्या पत्नीचे इन्व्हर्टर आणि इलेक्ट्रिकचे दुकान आहे. ७ एप्रिलला सचिन कामानिमित्त बाहेर गेला, ताे घरी परतलाच नाही. सचिन बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी टिटवाळा पाेलिस ठाण्यात दिली. दहागाव-बदलापूर रोडवर सचिन यांची गाडी तोडफोड झालेल्या अवस्थेत आढळून आली. याची माहिती पाेलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सचिनचा मृतदेह दहागावनजीक निर्जनस्थळी आढळून आला. त्याची ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आली हाेती. मात्र, हत्या का व काेणी केली याचा उलगडा झाला नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. दुकानात काम करीत असलेला सुनील मौर्या याने त्याचे साथीदार अभिषेक मिश्रा आणि शुभम गुप्ता यांच्या मदतीने सचिनची हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ या तिघांचा माग काढत त्यांना बेड्या ठोकल्या.
कशी केली हत्या...
- सायंकाळच्या सुमारास सचिनची पत्नी दुकानात येत असे. सुनील आपल्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहतो, असा संशय सचिनला होता. याच संशयातून सचिन सातत्याने सुनीलवर चिडत हाेता. त्याचबराेबर कामावरून काढून टाकण्याची धमकी देत हाेता. त्यामुळे सुनील संतापला.
- अखेर त्याने सचिनच्या हत्येचा कट रचला. शुभम व अभिषेक या दोन साथीदारांना सोबत घेतले. टिटवाळाजवळ दहागाव येथे एका फार्महाऊसमध्ये काम करायचे आहे, असा बहाणा करत सचिनला दहागाव येथे आणले.
- जंगलात पोहोचताच तिघांनी गळा आवळून सचिनची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पुरला. संशय येऊ नये म्हणून सोबत पालापाचोळा टाकून मेलेल्या म्हशीचे अवशेष पुरले. सचिनची गाडी आढळली. पोलिसांनी शोध घेतला असता, त्यांना सचिनचा जमिनीतून बाहेर आलेला हात दिसला. त्यामुळे गुन्हा उघड झाला.