मोटार थांबविल्याच्या रागातून तिघांची वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 03:30 PM2019-03-07T15:30:51+5:302019-03-07T15:33:30+5:30
वाहतूक नियमन करताना पोलिसांनी मोटार थांबविल्याचा राग मनात धरुन तिघा आरोपींनी पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली.
वाकड : वाहतूक नियमन करताना पोलिसांनी मोटार थांबविल्याचा राग मनात धरुन तिघा आरोपींनी पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार बुधवारी रात्री नऊच्या सुमारास थेरगाव येथील १६ नंबर जवळ घडला.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई जावेद मुजावर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर बापूराव झांबरे (वय २१) चेतन ज्ञानदेव पळसकर (वय ३०, रा. दोघेही नखाते वस्ती, रहाटणी), रविंद्र सरदेशमुख (वय २९, रा. चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद मुजावर यांच्यासह सुरज सुतार, मयूर जाधव विशाल ओव्हाळ हे वाकड ठाण्याकडून काळेवाडी फाट्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, १६ नंबर येथील फ्लोरियन्स सोसायटी चौकात वाहतूककोंडी झाल्याने मुजावर आणि सुरज सुतार हे वाहतूक नियमन करण्यासाठी थांबले. त्यावेळी आरोपी एका मोटारीतून तिथून जात होते. दरम्यान, वाहतूककोंडी असल्याने मुजावर यांनी त्यांची मोटार थांबविली. त्याचा राग आल्याने तू आमची गाडी का अडविली असे म्हणत दमदाटी व शिवीगाळ करत तिघा आरोपींनी त्यांना मारहाण केली.