पुरंदर किल्ल्यावरून सिमेंट मिक्सरचा ट्रक खाली कोसळून तीन जणांचा मृत्यू ; दोघे जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 07:22 PM2019-04-18T19:22:10+5:302019-04-18T21:28:51+5:30
पुरंदर किल्ला येथे (ता. पुरंदर) येथे सिमेंट मिक्सर ग्राईंडर किल्ल्यावरून कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला तर ०२ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सासवड : घेरा पुरंदर (ता. पुरंदर) येथील पुरंदर किल्ल्याच्या तळ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून ते सुरू असताना काँक्रीट वाहणारा सिमेंट मिक्सरचा ट्रक किल्ल्यावर नेताना चालकाचा ताबा सुटल्याने खाली कोसळला. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. १७) सायंकाळी ५.४५ वाजता घडली. या प्रकरणी ट्रकचालकवार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत प्रशांत भुजीगा धुळूगंडे (वय २८, रा. मु. पो. सुळकुड, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत आनंद कंपनी (वय २०, रा. दिलवाले वॉर्ड नंबर ५ विद्यालयाजवळ पो. करवाही, ता. म्हणशील, जि. सिद्धी, मध्य प्रदेश), मोनो रमेश बैगा (वय २१, रा. वॉर्ड नंबर ३ चहाही नगर परिषद मजीवली, ता. थाना, जि. मजीवली, मध्य प्रदेश), अनिल ब्रिजनंदन पनिका (वय २१, रा. कुशमहर, ता. सिद्धी, मध्य प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, रामबहर भवर बैगा (वय १९, रा. चरणी, पो. कुशमहर, ता. रामपूर, जि. सिद्धी, मध्य प्रदेश), राजकुमार रामकरण विश्वकर्मा (वय २३, धंदा-चालक, रा. घर नंबर २३, हाटवा, बरहटोला, पो. हाटवाखास, ता. सिहवल, जि. सिद्धी, मध्य प्रदेश) हे दोघे गंभीर झाले आहेत. या प्रकरणी मिस्कर ट्रकचालक राजकुमार रामकरण विश्वकर्मा (वय २३, रा. घर नंबर २३ हाटवा, बरहटोला पो. हाटवाखास, ता. सिहवल, जि. सिद्धी मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर किल्ला हा लष्कराच्या ताब्यात आहे. किल्ल्यावरील तळ्याची दुरुस्ती करण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी लागणारे काँक्रीट किल्ल्यावर नेले जात होते. या वेळी ट्रकचालक विश्वकर्मा याने माल भरून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरवर असणाऱ्या बंचिंग प्लांटवरून काँक्रीट भरून किल्ल्यावरील मुरारबाजी चौकात असणाऱ्या तलावांमध्ये भरण्यासाठी निघाला. या वेळी किल्ल्यावरील चौकातून वाहन वळवून मुख्य प्रवेशद्वाराकडे जात असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून मिक्सर ट्रक मागे आला आणि दरीमध्ये सुमारे २० फूट खोल कोसळला. या वेळी चालकाने ट्रकमधून बाहेर उडी मारल्याने तो बचावला. मात्र, मिक्सरच्या मागे असलेल्या तीन कामगारांच्या अंगावरून ट्रक खाली कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सासवड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. पो.नि. ए. बी. घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. महाजन पुढील तपास करीत आहे.