गॅसच्या ओट्याखालून तीन पिस्तूल आणि जीवंत काडतुसे जप्त; एकास अटक
By प्रदीप भाकरे | Published: December 4, 2022 03:36 PM2022-12-04T15:36:57+5:302022-12-04T15:38:15+5:30
अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथील एका रहिवाशाकडून तीन पिस्तूल व आठ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत. ...
अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथील एका रहिवाशाकडून तीन पिस्तूल व आठ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी ३ डिसेंबरच्या रात्री ही मोठी कारवाई केली. आरोपीने स्वत:च्या घरातील स्वयंपाकगृहात गॅस ओट्याच्या खाली सिमेंटची एक शेगडी तयार केली होती. त्यात ही पिस्तुले आणि काडतुसे दडविण्यात आली होती.
अंजनगाव सुर्जी येथून जवळच असलेल्या लखाड या गावातील मोहम्मद नवेद ऊर्फ गुड्डू अब्दुल सलीम (३०) ही व्यक्ती मध्य प्रदेशातून पिस्तूल आणून जिल्ह्यात विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या मागावर पोलीस बरेच दिवसांपासून होते. अखेर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे, ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात अंजनगाव सुर्जी पोलिसांनी ३ डिसेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास मोहम्मद नवेदच्या घरावर धाड टाकली. घराची झाडाझडती घेतली असता, किचनमध्ये गॅस ओट्याखाली शेगडीच्या आतमध्ये तीन गावठी पिस्तूल व त्यामध्ये आठ जिवंत नऊ एमएम काडतूस मिळून आले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मोहम्मद नवेद याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे.
अवैध धंदे करणाऱ्यांची उठबस -
पोलिसांनी ही कारवाई करताना अंत्यत गोपनीयता बाळगली होती. कारण लखाड येथे मोहम्मद नवेदचे चिकनचे दुकान असून तेथे अवैध धंदे करणाऱ्यांची उठबस असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे त्याने यापूर्वी पिस्तूल कोणाला विकल्या, हा व्यवसाय केव्हापासून करतो, याची माहिती पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे कुठवर पोहोचतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
यांनी केली कारवाई -
ठाणेदार दीपक वानखडे, पोलीस उपनिरीक्षक उल्हास राठोड, जमादार विजय शेवतकर, नाईक जयसिंह चव्हाण, हर्षा यादव, कॉन्स्टेबल विशाल थोरात, शुभम मारकंड, देवानंद पालवे हे कारवाई पथकामध्ये सहभागी होते.