गांधी जयंतीनिमित्त आर्थर रोड कारागृहातील 3 कैद्यांची करण्यात आली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 11:10 PM2018-10-02T23:10:53+5:302018-10-02T23:11:30+5:30
आर्थररोड प्रमाणेच राज्यभरातील तुरुंगांमध्ये गांधीजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई - महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीचे औचित्य साधत आर्थर रोड तुरुंगातून आज तीन कैद्यांची सुटका करण्यात आली. राज्यभरातील तुरुंगात असलेल्या १०० कैद्याची शिक्षा माफ करण्यात आली आहे. यात आर्थर रोड तुरुंगातील १४ कैद्यांचा समावेश असून या सर्व कैद्यांना टप्याटप्याने सोडण्यात येणार आहे.
गांधी जयंतीनिमित्त मुंबई सर्वोदय मंडळातर्फे आज एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गांधीजींच्या जीवन व कार्याबद्दल व्याख्यान देण्यात आले. मंडळाचे कार्यकर्ते प्रेमशंकर तिवारी व कमलेश गांधी यांनी दीडशे कैद्यांना मार्गदर्शन केले. तसेच मंडळातर्फे शिक्षा माफ होणाऱ्या कैद्यांना गांधीजींची आत्मकथा, ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक भेट देण्यात आले. आजच्या परिस्थितीत गांधी विचारांना पर्याय नसून, गांधी विचार अधिकाधिक कैद्यापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आर्थर रोड कारागृहाचे अधिक्षक हर्षद अहिरराव यांनी केले. यावेळी तुरुंगातून सुटका होणाऱ्या तीनही कैद्यांनी सुटकेनंतर गांधीजींच्या सत्य व अहिंसेच्या मार्गावर चालणार असल्याचे निवेदन केले. आर्थररोड प्रमाणेच राज्यभरातील तुरुंगांमध्ये गांधीजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.