पबजीच्या वेडानं जीव घेतला; आवाज कमी करण्यास सांगितल्यानं तिघांकडून एकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 03:54 PM2020-08-05T15:54:29+5:302020-08-05T15:55:03+5:30
पबजी खेळताना आवाज कमी करण्यास सांगितल्यानं तरुण संतापले
जम्मू: पबजी गेमची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. या गेमनं तरुणांना अक्षरश: वेड लागलं आहे. अनेक जण तासनतास पबजी खेळत असतात. याच पबजीच्या वेडानं एका व्यक्तीचा जीव घेतला आहे. जम्मूतल्या आर. एस. पुरामधील बड्याल काझीयन गावातल्या पबजी खेळणाऱ्या तिघांनी एका व्यक्तीची हत्या केली आहे. पबजी खेळताना आवाज कमी करा, असं संबंधित व्यक्तीनं तिघांना सांगितलं. त्याचा राग आल्यानं तिघांनी त्या व्यक्तीची हत्या केली. पीटीआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
राज कुमार, बिकराम जीत आणि रोहित कुमार पबजी खेळत होते. त्यावेळी त्यांना दलीप राज यांनी आवाज कमी करण्यास सांगितलं. त्यामुळे राज आणि तिघांमध्ये वाद झाला. आम्ही गेम खेळत असताना लक्ष विचलित का केलंस, अशी विचारणा तिघांनी राज यांच्याकडे केली. त्यांच्यातलं भांडण काही वेळानं निवळलं. मात्र याचा राग मनात धरून तिघांनी राज यांच्यावर त्याच दिवशी एका ओंडक्यानं हल्ला केला. त्यात राज अतिशय गंभीर जखमी झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पबजीची लोकप्रियता सातत्यानं वाढत आहे. हा गेम तरुणाईच्या पसंतीस उतरला आहे. मात्र अनेकांना पबजीचं व्यसन लागलं आहे. गेल्या महिन्यात पंजाबच्या जालंधरमध्ये एका तरुणानं पबजीमुळे स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. सतत पबजी खेळत असल्यानं तरुणाच्या वडिलांनी त्याचा स्मार्टफोन काढून घेतला. त्यामुळे मुलगा नाराज झाला. त्यानं स्वत:वर गोळी झाडू आयुष्य संपवलं. पबजीच्या वेडामुळे स्वत:ला किंवा इतरांना इजा पोहोचवल्याच्या अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं समोर येत आहेत.