किराणा व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्यासह तीन दरोडेखोर जेरबंद, दोन रिव्हॉल्व्हरसह रोकड जप्त
By जितेंद्र कालेकर | Published: January 10, 2023 10:02 PM2023-01-10T22:02:14+5:302023-01-10T22:03:48+5:30
या कारवाईत दोन रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसे, मोटारकार आणि रोकड असा एक लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ठाणे : एका घरफोडीतील आरोपीला जेरबंद केल्यानंतर वर्षभरापूर्वी किराणा मालाच्या व्यापाऱ्यावर गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या रफीक शेख उर्फ रफीक बाटला (४०, रा. राबोडी, ठाणे) याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी मंगळवारी दिली. त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसे, मोटारकार आणि रोकड असा एक लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ठाण्यातील राबोडी भागात ५ जानेवारी २०२३ रोजी एक चोरीचा गुन्हा घडला होता. याच गुन्हयात सहायक पोलिस आयुक्त सोनाली ढोले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेंद्र गुजर, सहायक पोलिस निरीक्षक योगेश घोंगडे आणि उपनिरीक्षक दीपक पाटील आदींच्या पथकाने रफीक शेख आणि रमेश कुंवर (३३, रिक्षा चालक, रा. ठाणे) या दोघांना ७ जानेवारी रोजी अटक केली होती. यातील रफीकच्या घरझडतीमध्ये पोलिस पथकाला दोन रिव्हाल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. त्यावेळी घाटेकर यांच्या पथकाने केलेल्या सखोल चौकशीमध्ये ५ फेब्रुवारी २०२२ रोजी राजेंद्र आणि रमेश यांनी याच भागातील किराणा व्यापाऱ्यावर गोळीबार केल्याची कबूली दिली.
या हल्ल्यात त्याच्या पोटाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला होता. उपचारानंतर तो या हल्ल्यातून बचावला होता. या हल्ल्यानंतर रफीकसह तिघेजण पळून गेले होते. ११ महिन्यांनी एका घरफोडीच्या तपासात आधीच्या खूनाचा प्रयत्नाचाही गुन्हा उघड झाल्याने त्यांचा तिसरा साथीदार अंजूम शेख (४०, रा. पहिली राबोडी, ठाणे) यालाही ९ जानेवारी २०२३ रोजी पोलिसांनी अटक केली. गोळीबाराच्या ठिकाणी मिळालेले काडतुस आणि वर्षभराने रफीकच्या घरात मिळालेले जिवंत काडतुसे दोन्ही एकच असल्याचेही तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना बोलते केल्यानंतर या गुन्हयाची उकल झाल्याची माहिती उपायुक्त गावडे यांनी दिली. यातील तिन्ही आरोपींना सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.