लूटमार करणारे तिघे ताब्यात, पोलिसांची शिताफीने कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 01:14 AM2018-11-08T01:14:25+5:302018-11-08T01:15:25+5:30
पुुणे-नगर रस्त्यावर लूटमार करणाऱ्या टोळीतील तिघांना शिक्रापूर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शिक्रापूर पोलिसांना पंधरा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
शिक्रापूर : पुुणे-नगर रस्त्यावर लूटमार करणाऱ्या टोळीतील तिघांना शिक्रापूर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शिक्रापूर पोलिसांना पंधरा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : पोलीस असल्याचे भासवून पुणे-नगर रस्त्यावरील कासारी फाटा येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास एका कंटेनर चालकावर कोयत्याने वार करून पाच हजार रुपये लुटण्यात आले. याप्रकरणी नागराज पंडित गोसावी (वय ३०, प्रीतमनगर, शिरूर), प्रशांत दिलीप माळी (वय २५), केदार मुरलीधर परीट (वय १९, दोघे रा. औसा, ता. लातूर) यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली.
सोमवारी रात्री अमोल साखरे (रा. आरमोरी, जि. गडचिरोली) हे रात्री कंटेनर घेऊन नगरच्या दिशेने निघाले होते. गाडीचा ब्रेक कमी लागतो, म्हणून ते शिक्रापूरजवळ कासारी फाटा येथे गाडी रस्त्याच्या कडेला लाऊन गाडीत झोपले होते.
यावेळी वरील तिघे संशयित दुचाकीवरून गाडीजवळ आले. त्यांनी गाडीचा दरवाजा वाजवत चालक अमोल साखरे याला पोलीस असल्याचे सांगितले. चालकाने दरवाजा उघडताच त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याचाजवळील पाच हजार तीनशे रुपये पळविले. तेथून ते शिक्रापूर येथील चाकण फाटा आले.
अधिक तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वारूळे करत आहे.
पाठलाग करून पकडण्यात यश
रात्रगस्तीवर असलेले पोलीस नाईक अनिल जगताप व होमगार्ड शिवले हे होते. त्यांना संशयित तिघे त्यांच्याकडील दुचाकीच्या नंबर प्लेटला काळे फडके बांधून फिरताना दिसल्याने जगताप यांना संशय आला. त्यानंतर पोलीस नाईक अनिल जगताप व शिवले यांनी तिघांचा पाठलाग करून पकडले. त्यांना पोलीस ठाण्यात आणले असता जखमी चालकदेखील तेथे आला. त्याने तिघांना ओळखत त्यांनी जखमी करून पैसे चोरल्याचे सांगितले.
कंटेनर चालकावर कोयत्याने वार करून पाच हजार रुपये लुटले
पोलीस असल्याची बतावणी
तिघांची टोळी
पोलिसांकडून शिताफीने कारवाई
वरिष्ठांकडून बक्षीस जाहीर