मीरा-भाईंदरसह मुंबई, भिवंडीत धुमाकूळ घालणाऱ्या तीन चोरांना अटक
By धीरज परब | Published: May 16, 2023 11:28 PM2023-05-16T23:28:35+5:302023-05-16T23:28:44+5:30
२७ मोबाईल व चोरीची रिक्षा जप्त
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: मीरा-भाईंदर सह मुंबई, भिवंडी आदी भागातील बस प्रवाशांचे तसेच वाटसरूंचे मोबाईल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना काशिमिरा पोलिसांनी अटक केली आहे . त्यांच्याकडून चोरीचे २७ मोबाईल व एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे अशी माहिती पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.
काशीमीरा पोलीस ठाणे हदीत देव गोपी शर्मा (३०) रा. न्यु समीर, जेसल पार्क, भाईंदर पूर्व हे रात्री डॉन बॉस्को शाळेकडे जाणा-या वळणावर आले असता रिक्षामधुन आलेल्या ३ इसमांनी येवुन शर्मा यांना, सही है वो असे बोलून त्यांच्या गालावर चापट मारली आणि खिशातील मोबाइल जबरीने चोरी करून पळाले होते. काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहायक आयुक्त विलास सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम, निरीक्षक कुमारगौरव धादवड , सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, उपनिरीक्षक निखिल चव्हाण व प्रकाश काबरे सह सचिन हुले, सुधीर खोत, राहुल सोनकांबळे, रविंद्र कांबळे, प्रविण टोबरे तसेच उपायुक्त कार्यालयातील जयप्रकाश जाधव यांनी गुन्ह्याचा तपास चालवला होता.
प्रशांत गांगुर्डे व पथक यांना वेर्स्टन हॉटेलकडुन हाटकेश कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक रिक्षा व त्यातील तिघेजण संशयास्पद रित्या आढळून आले. पोलिसांनी पाठलाग करून रिक्षा व त्यातील तिघांना पकडले. ते तिघेही भिवंडी चे राहणारे आहेत. इरशाद अब्दुल रौफ अन्सारी (३०) रा. नालापार्क, दिवानशहा दर्गाच्या मागे; मोहसीन मेहमूद खान (२६) रा. जैतुनपुरा, कॉटरगेट मस्जीदच्या मागे व शाहीद अख्तर अन्सारी (२७) रा. जैतुनपुरा, मंगलबजार स्लॅब, एकता हॉटेलच्या समोर अशी त्यांची नावे आहेत.
रिक्षाच्या तपासणीत प्रवासी सिटच्या मागे एक काळया रंगाच्या बॅगेत विविध कंपन्याचे २७ मोबाईल सापडले. त्या मध्ये शर्मा यांचा लुटलेला मोबाईल देखील सापडला. तर रिक्षा देखील इरशाद व मोहसीन यांनी काशीमीरा भागातून चोरलेली होती. पोलिसांनी तिघांना अटक करून २७ मोबाईल, रिक्षा असा ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक शाहिद हा रिक्षा चालक, मोहसीन हा हमाल तर इरशाद मेस्त्री काम करत असल्याचे सांगत असले तरी ते सराईत चोरटे आहेत. त्यांच्यावर पूर्वीचे ११ गुन्हे दाखल असून पोलीस जप्त मोबाईल मालकांचा शोध घेत आहेत. मीरा भाईंदर सह घोडबंदर ते अंधेरी, मुलुंड, भिवंडी आदी भागात बस मधील प्रवासी तसेच वाटसरुं चे मोबाईल चोरत असत. आरोपीं कडून आणखी अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.