तीन हजार गुंतवणूकदारांची मनीएज ग्रुपद्वारे फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 09:54 IST2025-01-16T09:54:50+5:302025-01-16T09:54:56+5:30
आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक करत दहा बँक खाते गोठवले आहे.

तीन हजार गुंतवणूकदारांची मनीएज ग्रुपद्वारे फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक
मुंबई : मनीएज ग्रुपद्वारे नागरिकांना जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून १०० कोटींना फसवल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मनीएज ग्रुपसह दोन पतसंस्थेच्या अध्यक्षांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला आहे. यामध्ये जवळपास तीन हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा संशय आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक करत दहा बँक खाते गोठवले आहे.
मालाडचा रहिवासी असलेला राहुल पोद्दार (३८) याच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिस ठाण्यात राजीव जाधव, हरिप्रसाद वेणुगोपा, प्रणव रावराणे, प्रिया प्रभू व इतर मनीएज ग्रुप ऑफ कंपनीमधील संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. यापैकी हरिदास आणि प्रणव रावराणे याला अटक झाली आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी २०१३ पासून मनीएज ग्रुप ऑफ कंपनीमध्ये विविध कंपनी स्थापन करून तसेच मुद्रा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड व जीवन मल्टी-स्टेट मल्टी-पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड स्थापन केल्या. त्यापैकी मनीएज इनव्हेसमेंट, मनीएज फिनकॉर्प, मनीएज रियल्टर्स आणि मनीएज कॅपिटल सर्व्हिसेस् या कंपनींकडे परवाना नसताना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.
आमिषाला बळी पडून पोद्दार यांच्यासह त्यांची पत्नी, आई, वडील, बहीण, सासू, जवळचे नातेवाईक, मित्रांनी गुंतवणूक केली. जानेवारी २०२२ ते मे २०२४ या काळात २ कोटी ८० लाख ८० हजार ७५० रुपये गुंतवले. त्यांच्या प्रमाणेच जवळपास ३००० हून अधिक गुंतवणूकदारांनी १०० कोटीहून अधिक रक्कम गुंतविल्याचा संशयही वर्तविण्यात आला आहे. आतापर्यंत १०० गुंतवणूकदार पुढे आले असून, फसवणुकीचा आकडा २८ कोटींवर गेला आहे. याचे कार्यालय मुलुंडमध्ये असल्याने मुलुंड पोलिसांनी गुन्हा नोंदवत, पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे हा गुन्हा वर्ग केला आहे.
गुंतवणुकीवर वर्षाला २४ टक्के परतावा
गुंतवणुकीवर वर्षाला २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यानुसार, तक्रारदाराने २०२२ मध्ये गुंतवणूक केली. गेल्यावर्षी मे महिन्यापासून परतावा मिळणे बंद झाल्याने त्यांनी ऑक्टोबर महिन्यात गुन्हे शाखेकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, चौकशीअंती गुन्हा नोंदवत कारवाई केली आहे.