लॉकडाऊन शिथील होताच चोरटे सुसाट ; उद्योगनगरीत चोरट्यांनी ट्रकसह पळविल्या तीन दुचाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 12:42 PM2020-06-10T12:42:14+5:302020-06-10T12:42:44+5:30
चार लाख ६० हजारांच्या वाहनांची चोरी
पिंपरी : लॉकडाऊन शिथील होताच चोरटे सुसाट झाल्याचे दिसून येते. उद्योगनगरीत एका ट्रकसह तीन दुचाकी चोरी झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार लाख ६० हजारांची वाहने चोरट्यांनी चोरून नेली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरीचा पहिला प्रकार १८ ते २५ मे दरम्यान भोसरी एमआयडीसीत सेक्टर १० येथे घडला. अनिकेत बाळू सोमवंशी (वय २१, रा. मोशी) यांनी मंगळवारी (दि. ९) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी सोमवंशी यांनी त्यांचा चार लाख रुपये किंमतीचा ट्रक एमआयडीसी भोसरी येथील एका कंपनीसमोर पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी ट्रक चोरून नेला.
वाहन चोरीचा दुसरा प्रकार भोसरी येथे पीएमटी चौकात ४ जून सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडला. राहूल काशिनाथ दासरे (वय ४०, रा. गुरुनानक कॉलनी, केशवनगर, कासारवाडी) यांनी मंगळवारी (दि. ९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी दासरे यांनी ४ जून रोजी सकाळी आठच्या सुमारास त्यांची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी पीएमटी चौक, येथील शिवाजी पुतळ्याच्या समोर उभी केली होती. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांना दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. वाहन चोरीचा तिसरा प्रकार चाकण येथे बस स्टॅण्डच्या पाठीमागे सोमवारी (दि. ८) दुपारी दोन ते चारच्या दरम्यान घडला. याप्रकरणी बारखू सखाराम साकोरे (वय ५२, रा. मोई, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी यांनी त्यांची ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी चाकण येथे बस स्टॅण्डच्या पाठीमागे पार्क केली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी हॅण्डल लॉक तोडून दुचाकी चोरून नेली.
वाहन चोरीचा चौथा प्रकार विठ्ठलवाडी, देहूगाव येथे १८ ते २० मार्च दरम्यान घडला. काना गंदला मैस्याया चिरंजीव (वय ३२, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी यांनी त्यांची १५ हजारांची दुचाकी विठ्ठलवाडी येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.