चिखलीतील घरकुलमध्ये टोळक्याकडून तीन वाहनांची तोडफोड; गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 04:15 PM2020-05-30T16:15:40+5:302020-05-30T16:17:10+5:30
सामान्य नागरिकांमध्ये दहशत
पिंपरी : चिखलीतील घरकुल परिसरात गुन्हेगारी टोळीच्या वर्चस्व वादातून अनिकेत रणदिवे याचा शुक्रवारी खून झाला. त्यामुळे संतापलेल्या आक्या बॉन्ड टोळीच्या १५ ते १६ जणांनी तीन वाहनांची तोडफोड केली. चिखली, घरकुल येथे शनिवारी (दि. ३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
पिल्या गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १५ ते १६ जणांच्या टोळक्याने घरकुल येथे एका इमारतीजवळील चारचाकी वाहनांवर दगडफेक केली. यात तीन वाहनांच्या काचा फुटल्या. त्यानंतर हे टोळके पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान आक्या बॉन्ड व अमित चव्हाण यांच्या टोळ्यांमध्ये घरकुल परिसरात वर्चस्वावरून वाद आहे. यातून १५ मे रोजी अमित चव्हाण याच्यावर खुनी हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आक्या बॉन्ड याला अटक केली. अमित चव्हाण याच्यावरील खुनी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आक्या बॉन्ड टोळीतील अनिकेत रणदिवे याचा खून करण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या आक्या बॉन्ड टोळीने वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे घरकुल परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.