दुचाकीच्या सीटखाली तीन गावठी पिस्तुले अन् चार काडतुसे!
By विजय.सैतवाल | Published: February 24, 2024 07:09 PM2024-02-24T19:09:29+5:302024-02-24T19:09:58+5:30
बजरंग बोगदा परिसरात कारवाई : विक्रीसाठी आलेला एक जण पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : दुचाकीच्या सीटखाली तीन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतूस घेऊन विक्रीसाठी जात असलेल्या किशोर रामदास कोळी (३०, रा. कांचननगर) या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बजरंग बोगदा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात येऊन त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरातील कांचननगरात राहणारा किशोर कोळी हा तरुण शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पिस्तूल विक्री करण्यासाठी बजरंग बोगदा परिसरात फिरत होता. याविषयीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यावेळी त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सपोनि अमोल मोरे, पोउनि गणेश वाघमारे, गणेश चौभे, विजयसिंग पाटील, विजय पाटील, सचिन महाजन, अक्रम शेख, महेश महाजन, किरण चौधरी, सुधाकर अंभोरे, प्रीतम पाटील, ईश्वर पाटील, प्रियंका कोळी हे बजरंग बोगदा परिसरात पोहोचले.
याठिकाणी फिरत असलेल्या किशोर कोळी याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीच्या (क्र. एमएच १९, सीए ००४०) सीटखाली तीन पिस्तुले व चार जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.