मंडप डेकोरेशनचे थकीत पैसे मागितले म्हणून तिघांनी केली मारहाण; कल्याणमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 09:55 PM2021-12-11T21:55:15+5:302021-12-11T21:55:23+5:30
एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात अन्य दोन जणांचा शोध सुरु
कल्याण-मंडपचे डेकोरेशनचे बाकी असलेले पैसे मागायला गेलेल्या मंडप चालकाला तीन जणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी कोळसेवाडी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत एकाला ताब्यात घेतले आहे. दोन जणांचा पोलिस शोध घेत आहेत.
कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसरात साईबाबा नगरात राहणारे सचिन कांबळे यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. या कामावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. काही दिवसापूर्वी त्यांनी एका ठिकाणी मंडप टाकण्याचे काम केले होते. त्या व्यक्तिकडे १२ हजार रुपये बाकी होते. काही दिवसापासून सचिन कांबळे हे त्याच्या मागे पैशासाठी तगादा लावत होते. त्यांच्या कामाचे पैसे मागण्यासाठी कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसरातील शिवम इमारतीत गेले. त्यांनी १२ हजार रुपयांची मागणी केली.
पैसे मागण्यासाठी घरार्पयत का आला याचा राग मनात ठेवून संदीप हनुमान पावशे, शेखर हनुमान पावशे, सागर उर्फ चिंटू हनुमान पावशे या तिघांनी मिळून सचिनला मारहाण केली. आधी शेखर आणि सागरने सचिनला बुक्क्याने मारहाण केली. संदीप याने लोखंडी रॉडने हल्ला केला. सचिन हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिासांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत सागर उर्फ चिंटू पावशे याला प्रथम ताब्यात घेतले आहे. अन्य दोन जणांचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र एक तर मंडपाचे काम करुन घेतले. एका गरीब व्यक्तिच्या कामाचे पैसे न देता त्याला मारहाण केल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.