कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’ करत कारखाना लुटला, रिक्षाचालकासह तीन महिलांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 03:12 AM2020-01-22T03:12:39+5:302020-01-22T03:14:16+5:30
कचरा वेचण्याच्या बहाण्याने हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये ‘रेकी’ करून एक कारखाना लुटणाऱ्या टोळीला वनराई पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : कचरा वेचण्याच्या बहाण्याने हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये ‘रेकी’ करून एक कारखाना लुटणाऱ्या टोळीला वनराई पोलिसांनी मंगळवारी अटक केली. यात एका रिक्षाचालकासह तीन महिलांचा समावेश असून त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम उपनगरात धुमाकूळ घातला होता.
नेरुल हसन (४२), राधेमां कवंडर (५५), शांती देवेंद्र (४२) आणि पल्लीमा देवेंद्र (४०) अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. हे सर्व जुहूच्या नेहरूनगर परिसरातील रहिवासी आहेत. हसन हा रिक्षाचालक तर उर्वरित महिला या कचरा वेचण्याचे काम करतात.
दोन आठवड्यांपूर्वी गोरेगावच्या सोनावाला मार्गावर लाइटचे बल्ब, ट्यूब बनविणाºया कारखान्यात चोरी करण्यात आली होती. यात लाखो रुपयांचे अॅल्युमिनियम, डायमेकिंग मशीन, तसेच अनेक महागड्या वस्तू लंपास करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी कारखाना मालकाने वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
वनराई पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राणी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. त्यांनी सीसीटीव्ही पडताळणी केली तेव्हा दिंडोशी परिसरातदेखील अशाच प्रकारे चोरी करण्यात आल्याचे त्यांना समजले. दरम्यान, संशयित महिला या जुहूच्या नेहरूनगर परिसरात राहात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे यांना मिळाली. त्यानुसार हसनसह तिन्ही महिलांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार या चौघांना अटक करण्यात आली आहे. वनराईसह दिंडोशी, जुहू, अंधेरी, डी.एन. नगरमध्येही त्यांनी असे प्रकार केल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.