महिलेचा विनयभंगप्रकरणी एकास तीन वर्ष सश्रम कारावास
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: March 4, 2023 02:35 PM2023-03-04T14:35:26+5:302023-03-04T14:36:17+5:30
नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रियदर्शनी थोरात यांनी गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले होते
नंदुरबार : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नंदुरबारातील एकाला नंदुरबार येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी तीन वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. नंदुरबार शहरातील एका महिलेचा १० नोव्हेंबर २०१० रोजी विनयभंग केल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चंद्रशेखर मुरलीधर भस्मे (४९) रा. नूतन हायस्कूलसमोर, नंदुरबार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी त्याला अटक केली होती.
नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रियदर्शनी थोरात यांनी गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी चंद्रशेखर मुरलीधर भस्मे याच्या विरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद चव्हाण यांनी साक्षीदारांचे जबाब,पंच,आणि परिस्थितीजन्य पुरावे तपास अधिकारी यांची साक्ष,सरकारी पक्षाचा युक्तिवाद या सर्व बाबींचा विचार करून आरोपी चंद्रशेखर मुरलीधर भस्मे यास तीन वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुनील पाडवी यांनी पाहिले होते. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक राहुल भदाणे, पोलिस हवालदार गणेश धनगर, मनोज साळुंखे, पोलिस नाईक गिरीश पाटील यांनी कामकाज केले आहे.