खुनाचा थरार! प्रॉपर्टीच्या वादातून दिवसाढवळ्या सपासप वार करून एकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 06:52 PM2020-12-17T18:52:51+5:302020-12-17T18:53:21+5:30
Murder : कमाल चौकाजवळ थरार - दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
नागपूर - प्रॉपर्टीच्या वादातून दोघांनी गुड्डू तिवारी नामक व्यक्तीची शस्त्राचे घाव घालून निर्घृण हत्या केली. अत्यंत वर्दळीच्या कमाल चौकाजवळच्या शनिवार बाजारात गुरुवारी सायंकळी ही थरारक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पिंटू किल्लेदार आणि विवेक गोडबोले या दोन संशयीतांना ताब्यात घेतले.
गुड्डू न्यायमंदीर परिसरात वाहन पार्किंगचे काम करायचा. तर, काही दिवसांपासून गुड्डू, पिंटू आणि विवेक हे तिघेही प्रॉपर्टी डिलींगचे काम करायचे. त्यांचा जुना क्राईम रेकॉर्डही आहे. एका प्रॉपर्टीच्या साैद्यावरून त्यांच्यात दोन दिवसांपासून धूसफूस सुरू होती. गुरुवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास हे तिघे शनिवार बाजारातील अवैध गुत्त्यावर एका झोपड्यात बसून होते. दारूच्या नशेत तेथे पुन्हा त्यांच्यात धुसफूस सुरू झाली. गुड्डूने आईबहिणीवरून शिवीगाळ केल्याने संतापलेल्या पिंटू आणि विवेकने त्याच्यावर घातक शस्त्राचे सपासप घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. या प्रकारामुळे बाजारात प्रचंड थरार निर्माण झाला. अनेकांनी आपापले दुकान गुंडाळून तेथून पळ काढला. माहिती कळाल्यानंतर पाचपावलीचे ठाणेदार किशोर नगराळे आपल्यास सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. परिमंडळ तीनचे उपायुक्त लोहित मतानी हेसुद्धा तेथे पोहचले. पोलिसांनी गुड्डूचा मृतदेह रुग्णालयात रवाना केला. आजुबाजुच्यांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी लगेच पिंटू आणि विवेकलाही ताब्यात घेतले.
जुगारी, नशेडी आणि गुन्हेगारांची वर्दळ
ज्या ठिकाणी गुड्डूची हत्या झाली तेथे सर्रास अवैध धंधे सुरू असतात. सट्टा, अड्डा, मटका, जुगार आणि अवैध दारू विक्रीही चालते. तेथेच अंडा, आमलेटही मिळते. त्यामुळे या ठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत दारूडे, नशेडी, जुगारी आणि गुन्हेगारांची वर्दळ असते. पोलिसांना माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप आहे.