थरारक ! पुणे पोलीस आयुक्तालयाजवळ भर दुपारी गोळीबार; बांधकाम व्यावसायिकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 06:50 PM2020-10-05T18:50:49+5:302020-10-05T18:52:15+5:30
खून झालेल्या बांधकाम व्यावसायिकांचा जागेवरून काही जणांशी होता वाद..
पुणे : शहरात भर दिवसा पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर गोळीबार करुन एका बांधकाम व्यावसायिकाचा खुन करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील स्टेट बँकेसमोरील फुटपाथवर दुपारी तीन वाजता ही घटना घडली.
राजेश हरिदास कानाबार (वय ४५, रा. घोरपडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.
कानाबार यांचा काही जणांशी जागेवरुन वाद सुरु होता.जागेच्याबाबत त्यांची न्यायालयात आज तारीख असल्याची माहिती मिळाली. ते जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील स्टेट बँकेसमोरील फुटपाथवर उभे असताना मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांच्यापैकी एकाने आपल्याकडील पिस्तुलातून कानाबार यांच्यावर गोळीबार केला आणि ते पळून गेले.
गोळी लागल्याने जखमी झालेल्या कानाबार यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला.
या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त अशोक मोरोळे, डॉ. संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्यासह बंडगार्डन पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांना हल्लेखोरांची नावे समजली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे़.