थरारक ! भर दिवसा पोलिसाला मारहाण; चाकूचा धाक दाखवून 'युपीआय'वर १ लाख मागितले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 01:31 PM2020-12-11T13:31:46+5:302020-12-11T13:34:35+5:30
नागरिकांनी गर्दी केल्यानंतर त्यांनादेखील जवळच्या हत्याराने भीती दाखवून पळ काढण्याचा प्रयत्न
बीड : पोलीस कर्मचारी मित्रासोबत खाजगी कामासाठी जात होते. यावेळी नेकनूर पोलीस ठाणेहद्दीतील येळंबघाट परिसरातील पुलावर त्यांच्या गाडीला दुचाकी आडवी लावून जबर मारहाण करण्यात आली. तसेच चाकूचा धाक दाखवून हातातील घड्याळ, मोबाईल हिसकावून घेतला. नागरिकांनी गर्दी केल्यानंतर त्यांनादेखील जवळच्या हत्याराने भीती दाखवून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र, नागरिकांनी त्यांना पकडले व बेदम चोप दिला.
नेकनूर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
समाधान खराडे हे केज पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते व त्यांचे मित्र चारचाकीमधून जात होते. यावेळी दुपारी पुलावर त्यांच्या गाडीला दुचाकी (क्र.केए ३२ आयएफ ३०७) आडवी लावली. त्यानंतर खराडे व त्यांचे मित्र सुग्रीव सक्राते यांना बाजूला घेऊन मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळील मोबाईल, हातातील घड्याळ व रोख रक्कम हिसकावून घेतली. तसेच मोबाईलवरून १ लाख रुपये पाठव असे म्हणत मारहाण केली.
दरम्यान, आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी गर्दी केली. मात्र, निर्ढावलेल्या चोरट्यांनी नागरिकांना देखील हत्यारांची भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठी गर्दी जमा झाली होती. काही नागरिकांनी आरोपींना बेदम चोपही दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी महम्मद इम्रान मोहम्मद अब्दुल लतीफ (रा. शहाबाजार माशाअल्ला बिल्डिंग, औरंगाबाद ) मोहम्मद फैसल मोहम्मद आयाज (रोशन गेट, औरंगाबाद), शेख अहेमद शेख मक्बुल(रा.गुलबर्गा, कर्नाटक) आणि मोहम्मद सद्दाम मोहम्मद गौस (पाकीजा गल्ली गुलबर्गा, कर्नाटक) यांना अटक केली. त्यांच्यावर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोउपनि किशोर काळे हे करीत आहेत.
जिल्ह्यातील अनेक प्रकरणे उघड होण्याची शक्यता
जिल्ह्यातील विविध भागांत मागील काही दिवसांपासून चोरी, घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातील अनेक प्रकरणांत या आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
कुख्यात आरोपींचा सहभाग
याप्रकरणात अटक केलेल्या चारही आरोपींवर इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, यातील मोहम्मद इम्रान मोहम्मद अब्दुल याच्यावर औरंगाबादमध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकट्या जिन्सी पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याच्यावर ‘एमपीडीए’ कायद्यान्वयेही कारवाईदेखील केलेली आहे.