साताऱ्यात कोयता घेऊन थरारक पाठलाग, एकावर वार; भरवस्तीतील घटनेने खळबळ
By दत्ता यादव | Published: April 5, 2023 09:54 PM2023-04-05T21:54:09+5:302023-04-05T21:54:51+5:30
जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा : येथील शेटे चाैकात चार ते पाच तरुणांनी एका तरुणाचा थरारक पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शेटे चाैकामध्ये रात्री नेहमीप्रमाणे रस्त्यावर वर्दळ होती. याचवेळी एक युवक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरून धावत होता. त्याच्या चार ते पाच तरुण थरारक पाठलाग करत होते. त्यातील एका तरुणाच्या हातात कोयता होता. भरवस्तीत हा प्रकार घडल्याने शहरात दहशतीचे वातावरण तयार झाले. संबंधित तरुणाच्या हातात कोयता पाहून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला घाबरून बाजूला झाल्या.
जखमी तरुणाच्या मानेवर कोयत्याचा वार करतानाच काही नागरिकांनी तातडीने धाव घेऊन संबंधित तरुणाची त्यांच्या तावडीतून सुटका केली. हा वाद नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. या घटनेनंतर सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी या टोळक्यातील एक तरुण पोलिसांच्या हाती लागला. मात्र, इतर तरुण घटनास्थळावरून पसार झाले. जखमी तरुणाला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही मुले अल्पवयीन असल्याचे बोलले जात आहे. सातारा शहर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.
सीसीटीव्ही फुटेज तपासले...
शेटे चाैकातील ज्या दुकानासमोर हा वाद झाला. त्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. यावेळी सीसीटीव्हीमध्ये काेयत्याचा सारा थरार कैद झाला आहे. तसेच संशयित मुलांची ओळखही पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले.