थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 08:26 PM2020-08-01T20:26:42+5:302020-08-01T20:27:42+5:30
मृत पंकज सिडामविरुद्धसुद्धा भादंविचे कलम ३९२, ३२४ असे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अमरावती : क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत शोभानगरात शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला त्याच्या मित्राच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालवली.
पंकज गोकूळ सिडाम (२८, रा. शोभानगर), असे मृताचे नाव आहे. पोलीससूत्रानुसार, धीरज विश्वासराव ठाकरे (२८), सागर गजानन खरड(२२, दोघे रा. शोभानगर), असे आरोपीचे नाव आहे. पूर्वाश्रमीचा खून प्रकरणातील आरोपी धीरज ठाकरे याने पंकजला एका पाणटपरीवर बोलावले. तेथे पंकजशी बाचाबाची झाली. तू फार मोठा झाला का, असे पंकजने आरोपीला म्हटले असता, वाद घालून दुसऱ्या आरोपीच्या संगनमताने पंकजला चाकूने भोसकण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पंकजला अन्य मित्रांनी तातडीने इर्विन रुग्णालयात आणले. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त यशवंत सोळंके, एसीपी सोहेल खान, गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पीआय विजय यादवसह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. त्यानंतर रात्री उशिरा आरोपी धीरज ठाकरे, सागर खरड याला वडाळी परिसरातून ताब्यात घेऊन चौकशीअंती अटक केली. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणी १० जणांचे बयाण नोंदविण्यात आले.
मृतासह आरोपीविरुद्ध पूर्वीचे गुन्हे दाखल
क्षुल्लक कारणावरून पंकजची हत्या करण्यात आली. मात्र, यातील आरोपी धीरज ठाकरेविरुद्ध सात वर्षांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता. तर तीन वर्षांपूर्वी भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली. मृत पंकज सिडामविरुद्धसुद्धा भादंविचे कलम ३९२, ३२४ असे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चाकूने भोसकल्याची प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. दोघांना रात्रीच अटक केली आहे. यातील एका आरोपीविरुद्ध यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता. आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
- मनीष ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर
अन्य महत्वाच्या बातम्या...
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल
तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्...
रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
वेश्याव्यवसाय प्रकरणी कोलव्यात मध्यप्रदेशातील एकजण जेरबंद