थरारक! पूर्ववैमनस्यातून तलवार, कोयत्याने सपासप वार करून एकाची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 03:03 PM2020-12-16T15:03:38+5:302020-12-16T15:04:23+5:30
Murder : पूर्व वैमनस्यातून कृत्य; चौघांना अटक
सातारा - घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्याच्या कारणावरून एक वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा राग मनात धरून एकाची तलवार आणि कोयत्याने निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील बोगदा परिसरात मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली. या खून प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे.बजरंग लक्ष्मण गावडे (वय ४०, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकाश नितीन बल्लाळ (वय २०), अमन इस्माईल सय्यद (वय २०), तुषार प्रल्हाद धोत्रे (वय २४), आकाश उदयसिंह शिंदे (वय २४, सर्व रा. समर्थ मंदिर, बोगदा परिसर सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक वर्षांपूर्वी आकाश बल्लाळ याच्या घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्यात आले होते. यावरून बजरंग गावडे आणि आकाश बल्लाळ यांच्यात मारामारी झाली होती. यावेळी गावडे याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. या भांडणामुळे आकाश बल्लाळला तो राहत असलेले भाड्याचे घर सोडून दुसरीकडे राहायला जावे लागले होते, असा समज झाल्याने आकाश बल्लाळ गावडेवर चिडून होता. दरम्यान, मंगळवार दि. १५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बजरंग गावडे हा बोगद्या परिसरातील रस्त्याने घराकडे निघाला होता. यावेळी आकाश बल्लाळ, अमन सय्यद, तुषार धोत्रे, आकाश शिंदे यांनी बजरंग गावडे याच्यावर कोयता आणि तलवारीने जोरदार हल्ला चढवला. बजरंग गावडे यांच्या चेहर्यावर मानेवर खोलवर घाव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बजरंग गावडे यांचा संपूर्ण चेहरा छिन्नविछीन्न झाला. या प्रकारानंतर संशयित हल्लेखोर तेथून पसार झाले. रात्री बोगदा परिसरात खून झाल्याची माहिती नागरिकांना समजल्यानंतर एकच खळबळ उडाली.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरणच्या टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून हल्लेखोरांची माहिती या पथकाने घेतली. हल्लेखोर अज्ञात असल्याने तपासाचे आव्हान पोलिसांसमोर होते. गावडे यांच्या घरातल्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आमचा कोणासोबतही वाद नव्हता अशी त्यांनी माहिती पोलिसांना दिली. मात्र गुन्हे प्रकटीकरण शाखेने कौशल्यपूर्ण तपास करत चौघाही हल्लेखोरांना काही तासातच अटक केली.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, अविनाश चव्हाण, गणेश घाडगे, अभय साबळे, विशाल धुमाळ, शिवाजी भिसे, गणेश भोंग यांनी या खुनाचा काही तासातच छडा लावला.