रेल्वेत संतापजनक घटना: पुण्याकडे येण्यासाठी निघालेल्या तरुणीची टीसीनेच काढली छेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:43 IST2025-03-26T16:43:06+5:302025-03-26T16:43:46+5:30
तिकीट तपासनिसाच्या त्रासामुळे तरुणी जवळ असलेल्या स्वच्छतागृहात जाऊन बसली. भीतीपोटी ती जवळपास १५ ते २० मिनिटे तेथेच बसून होती.

रेल्वेत संतापजनक घटना: पुण्याकडे येण्यासाठी निघालेल्या तरुणीची टीसीनेच काढली छेड
मनमाड : गोरखपूर-बंगळुरू या विशेष गाडीने कानपूर येथून पुणे येथे जाण्यासाठी प्रवास करणाऱ्या तरुणीशी तिकीट तपासनिसाने गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रेल्वे तिकीट तपासनीस तिवारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाडी क्रमांक ०६५३० गोरखपूर बंगळुरू या ग्रीष्मकालीन विशेष प्रवासी रेल्वे गाडीने कानपूर येथून पुण्याला जाण्यासाठी फिर्यादी तरुणी प्रवास करत होती. तिने केलेले आरक्षण कन्फर्म झाले नव्हते. ते आरएसी होते. त्यामुळे तिने संबंधित तिकीट तपासनिसाकडे जागेच्या उपलब्धतेसाठी विचारणा केली. त्यावर तिला बी/४ या कोचमध्ये बसण्यास सांगितले. त्यानंतर मात्र तिला ए/१ कोचमधील पाच क्रमांकाची सीट देण्यात आली. फिर्यादी त्या सीटवर गेली असता तिवारी देखील तेथे येऊन बसले. त्यांनी तिला अयोग्य प्रकारे स्पर्श केला. सुरुवातीला चुकून हा स्पर्श झाला असल्याचे समजून युवतीने दुर्लक्ष केले. मात्र नंतर संबंधिताने असाच प्रकार पुन्हा केला. एकटीच प्रवास करणारी तरुणी घाबरली व स्वच्छतागृहात जाऊन बसली.
काही काळ थांबावे लागले स्वच्छतागृहात
तिकीट तपासनिसाच्या त्रासामुळे तरुणी जवळ असलेल्या स्वच्छतागृहात जाऊन बसली. भीतीपोटी ती जवळपास १५ ते २० मिनिटे तेथेच बसून होती. बाहेर आल्यावर तिकीट तपासनीस तेथेच उभा असलेला पाहून तिने वडिलांशी संपर्क साधून सर्व प्रकार कथन केला. भुसावळ स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. मनमाड पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवून घेतला आहे.
रेल्वेतील सुरक्षा जवान कुठे ?
प्रत्येक रेल्वे डब्यात व त्यातल्या त्यात वातानुकूलित डब्यात प्रवाशांच्या संरक्षणासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना नियुक्त केलेले असते. घटना झाली त्यावेळी संबंधित सुरक्षा जवान कोठे होता, तो आपले कर्तव्य निभवण्यात कमी पडला का, याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे.