TikTok स्टार फन बकेट भार्गवला बलात्कारप्रकरणी अटक; अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 09:23 PM2021-04-23T21:23:13+5:302021-04-23T21:23:59+5:30
Rape Case : अल्पवयीन पीडिता चार महिन्यांची गर्भवती आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी फन बकेट उर्फ चिप्पाडा भार्गव याच्याविरोधात कारवाई केली.
फन बकेट भार्गव या नावाने प्रसिद्ध असलेल्या TikTok स्टारला बलात्कार प्रकरणात अटक झाली आहे. विशाखापट्टणममध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन पीडिता चार महिन्यांची गर्भवती आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी फन बकेट उर्फ चिप्पाडा भार्गव याच्याविरोधात कारवाई केली.
फन बकेट भार्गव याने पीडित तरुणीचे टिकटॉक व्हिडीओ पाहून तिला अनेक ऑफर दिल्या होत्या. नंतर त्याने तिला प्रपोज केले होते, मात्र तिने त्याचा प्रेमाचा प्रस्ताव नाकारला होता. मात्र तुझे आक्षेपार्ह व्हिडीओ माझ्याकडे आहेत, असं सांगून भार्गवने तिला ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेम काजल यांनी दिली. पीडितेच्या आई वडिलांनी विशाखापट्टणममधील पेंढुर्ती पोलिस स्थानकात फन बकेट भार्गव याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. बलात्कार पीडिता चार महिन्यांची गरोदर असल्याचं समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.फन बकेट भार्गव याला पोलिसांनी हैदराबादमध्ये अटक केली. भार्गव हा ओ माय गॉड! ओ माय गॉड! सारख्या टिकटॉक व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. फन बकेट भार्गव याला ३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाची निसान कार आणि मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.