खासगी फोटोंवरुन 50 महिलांना केलं ब्लॅकमेक; टिकटॉक स्टार गजाआड, 'असा' ओढायचा जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 12:40 PM2022-11-26T12:40:45+5:302022-11-26T12:48:08+5:30

राजस्थानच्या शाही घराण्यातील असल्याचं सांगून महिलांशी मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका भामट्याचा अखेर पर्दाफाश झाला आहे.

tiktok star rajveer singh alias devasi arrest by goregaon police for blackmailing women by showing private photos | खासगी फोटोंवरुन 50 महिलांना केलं ब्लॅकमेक; टिकटॉक स्टार गजाआड, 'असा' ओढायचा जाळ्यात

फोटो - TV9 hindi

googlenewsNext

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. राजस्थानच्या शाही घराण्यातील असल्याचं सांगून महिलांशी मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका भामट्याचा अखेर पर्दाफाश झाला आहे. तब्बल 50 महिलांची फसवणूक करणाऱ्या टिकटॉक स्टारला पोलिसांनी अटक केली आहे. हा टिकटॉक स्टार महिलांकडे त्यांचे खासगी फोटो मागवायचा. त्यानंतर या महिलांना ब्लॅकमेल करायचा. एका महिलेने या प्रकरणी तक्रार केल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी या टिकटॉक स्टारला अटक केली आहे.

देवासी ऊर्फ राजवीर सिंग असं या टिकटॉक स्टारचं नाव असून तो मूळचा राजस्थानचा आहे. तो महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी अनोखी पद्धत वापरत होता. इन्स्टाग्रामवर राजस्थानी राजवाड्यांमधील स्वत:चे शेकडो फोटो पोस्ट करत होता. त्यानंतर तो तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. राजघराण्यातील व्यक्ती म्हणून अनेत तरुणी त्याच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायच्या. हळूहळू संवाद वाढल्यावर प्रेमात पडल्याचं सांगायचा आणि त्यांचे खासगी फोटो मागायचा. तरुणी आणि महिलांनी खासगी फोटो पाठवल्यानंतर हे खासगी फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी द्यायचा. 

'असा' ओढायचा जाळ्यात

काही तरुणी आणि महिला बदनामी होऊ नये म्हणून त्याच्या धमकीला बळी पडायच्या. पण एका महिलेने त्याचा पर्दाफाश केला आहे. गोरेगाव येथे राहणारी एक 30 वर्षीय विवाहित महिला देवासीच्या जाळ्यात सापडली होती. तिलाही देवासीने पैसे न दिल्यास तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे बदनामीच्या भीतीने या महिलेने त्याला चार लाखाहून अधिक रक्कम दिली. पण तो या महिलेला वारंवार पैसे मागत असल्याने अखेर या महिलेने गोरेगाव पोलिसात तक्रार केली. 

महिलेच्या तक्रारीनंतर गोरेगाव पोलिसांनी देवासीला मंगळवारी रात्री आरे कॉलनीतून अटक केली. त्याच्यावर खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आयटी कायद्याखालीही त्याला अटक केली आहे. आरोपी देवासी उर्फ राजवीर सिंगला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्री थोपटे यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: tiktok star rajveer singh alias devasi arrest by goregaon police for blackmailing women by showing private photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.