टिकटॉक स्टार सोनाली फोगट हत्या प्रकरण : रोहतकमध्ये सुधीर सांगवान यांच्या कुटुंबियांची पोलिसांकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 09:58 AM2022-09-05T09:58:37+5:302022-09-05T09:59:26+5:30
सुधीर यांची प्रॉपर्टी आणि बँक खात्याबाबतही सवाल करण्यात आले. रोहतकच्या सनसिटीमध्ये उभारलेल्या घराबाबतही चौकशी करण्यात आली. गोवा पोलिसांनी चौकशीनंतर मीडियाशी कोणतीही चर्चा केली नाही.
पणजी / रोहतक : टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हत्याकांडाच्या तपासात गोवा पोलिसांची तीन सदस्यीय टीम हरयाणाच्या रोहतकमध्ये रविवारी पोहचली. त्यांचे खासगी सहायक सुधीर सांगवान यांच्या घरी ही टीम दाखल झाली. पोलिसांनी जवळपास एक तास सुधीर यांची पत्नी आणि त्यांचे वडील यांना प्रश्न विचारले.
सुधीर यांची प्रॉपर्टी आणि बँक खात्याबाबतही सवाल करण्यात आले. रोहतकच्या सनसिटीमध्ये उभारलेल्या घराबाबतही चौकशी करण्यात आली. गोवा पोलिसांनी चौकशीनंतर मीडियाशी कोणतीही चर्चा केली नाही. भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगाट खून प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी त्यांचे कुटुंबीय करत आहेत. यावर ‘गोवा पोलीस सक्षम पोलीस फोर्स आहे. आम्ही हे प्रकरण तार्किक शेवटापर्यंत घेऊन जाऊ’, असे गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांचे म्हणणे आहे.
प्रसार माध्यमांनी सोनाली फोगट प्रकरणात, सीबीआय चौकशीची मागणी होते त्यावर महासंचालकांची प्रतिक्रिया विचारली. त्याबद्दल महासंचालक म्हणाले की, गोवा पोलिसांचे ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत चांगले आहे. खुनाच्या १०० टक्के प्रकरणांचा येथे छडा लागतो. सध्या गोव्याची टीम हरियाणात तपास करत आहे. यावर महासंचालकांनी अधिक माहिती दिली.
गोवा व हैदराबाद पोलिसांत जुंपली
- हैदराबाद पोलिसांनी गोवा पोलिसांकडे बोट दाखवत मुख्य ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात गोवा पोलीस सहकार्य करत नसल्याचा गंभीर आरोप केला होता. गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी प्रत्युत्तरादाखल हैदराबाद पोलिसांनी कधी सहकार्य मागितलेच नसल्याचे विधान केले आहे.
- या विधानानंतर ड्रग्ज प्रकरणावरून गोवा आणि हैदराबाद पोलिसांमध्ये जुंपली आहे. या पेडलरचा सोनाली फाेगाट हत्येशीही संबंध असल्याचे हैदराबाद पाेलिसांचे म्हणणे आहे.