नोव्हेंबरपर्यंत मुंबईचे पोलीस आयुक्त बर्वेच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 06:48 PM2019-08-28T18:48:23+5:302019-08-28T18:52:33+5:30
नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे.
मुंबई - काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या असून त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ यासाठी मुंबई पोलीस आयुक्तसंजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदी कार्यरत असलेले संजय बर्वे हे ३१ ऑगस्ट रोजी सेवा निवृत्त होणार होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ वाढविल्याने नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे.
अत्यंत कडक शिस्तीचे, मृदू स्वभावाचे आणि स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून मुंबई पोलीस आयुक्त म्हणून संजय बर्वे यांची ओळख आहे. माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांची पोलीस महासंचालकपदी निवड झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी बर्वे यांची निवड करण्यात आली. मात्र, सहा महिन्यांनी बर्वे हे सेवा निवृत्त होणार होते. अत्यंत कमी काळात बर्वे यांनी आयुक्त पदाची धूरा अत्यंत चांगल्यारित्या संभाळली. ३१ ऑगस्ट रोजी बर्वे हे निवृत्त होणार असल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त पदी वर्णी लागण्यासाठी अनेक दिग्गज आयपीएस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक पद्धतीने मोर्चे बांधणी सुरू केली होती. मात्र, भारताने काश्मिरमधील कलम ३७० हटवल्यामुळे आधिच तणावाचे वातावरण असताना. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित आणि समाजविघातक घटना महाराष्ट्रासह देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घडू नये. या अनुशंगाने संजय बर्वे यांना मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महिन्याभरापासून बर्वे यांना मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत चर्चा रंगत आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदाची माळ बर्वे यांच्या गळ्यात पडल्यानंतर अनेक अमराठी अधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली होती. अमराठी अधिकाऱ्यांनी लॉबिंग देखील केली होती. लवकरच गृहखात्याकडून बर्वे यांच्या मुदतवाढीचे आदेश जारी केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंबई पोलिस आयुक्तपदी १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी संजय बर्वे आहेत. संजय बर्वे हे याआधी राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. अत्यंत हुशार आणि शिस्तप्रिय अशी बर्वे यांची ओळख आहे.