रोजगार गेल्याने पोटच्या मुलाला विकण्याची वेळ; आई-वडिलांसह एजंट महिलेला कल्याणमध्ये अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 07:04 AM2021-05-24T07:04:20+5:302021-05-24T07:04:56+5:30
Crime News: कोरोनामुळे होणारे लॉकडाऊन व सततच्या कठोर निर्बंधांमुळे रोजगार नसल्याने उल्हासनगरच्या एका रिक्षाचालकाने परिस्थितीला कंटाळून चक्क पोटच्या गोळ्याला ९० हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला.
कल्याण : कोरोनामुळे होणारे लॉकडाऊन व सततच्या कठोर निर्बंधांमुळे रोजगार नसल्याने उल्हासनगरच्या एका रिक्षाचालकाने परिस्थितीला कंटाळून चक्क पोटच्या गोळ्याला ९० हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला. पत्नी आणि सात मुलांचे पालनपोषण कसे करायचे, या विवंचनेत हा रिक्षाचालक होता. जिल्हा महिला बालसंरक्षण कक्षाने कल्याण गुन्हे शाखेच्या सहकार्याने कल्याण रेल्वेस्थानकावर सापळा रचून आई-वडिलांसह महिला एजंटला शनिवारी रात्री अटक केली. तिघांना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
साईनाथ भोईर हा मूळचा उल्हासनगरचा आहे. रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. पत्नी आणि सात मुले असे त्याचे कुटुंब आहे. मागच्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले. लॉकडाऊन सुरू होण्याआधीच साईनाथवर कर्ज होते. त्यात पुन्हा निर्बंध लागू झाल्याने उत्पन्नाअभावी घरखर्च कसा भागवायचा, हे त्याच्यासमोर मोठे आव्हान होते. सततच्या निर्बंधांमुळे तो आर्थिक विवंचनेत होता. याच कालावधीत त्याच्या संपर्कात मानसी जाधव नामक महिला आली. मानसी ही पूर्वी एका सामाजिक संस्थेत कामाला होती. मानसीने साईनाथला त्याचा पाच महिन्यांचा मुलगा विकत मागितला. त्या बदल्यात साईनाथला ९० हजार रुपये देण्याचे कबूल केले. मानसीला दुसऱ्याकडून या मुलाच्या मोबदल्यात दोन लाख रुपये मिळणार होते. याची माहिती मिळताच, शहानिशा करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाने तोतया ग्राहक पाठविले होते.
त्याच्या माध्यमातून मानसी, साईनाथ आणि त्याची पत्नी मुलाला घेऊन कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील दीपक हॉटेल येथे येणार असल्याची माहिती संबंधित विभागाला मिळाली. त्यानुसार जिल्हा महिला बालसंरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, पल्लवी जाधव, रोहिणी शिरसाट, कृष्णा मोरे यांच्या पथकाने कल्याण गुन्हे शाखेचे अधिकारी अशोक कडलक यांच्यासह सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांना पोलिसांच्या हवाली केले आहे.
मुले खरेदी-विक्रीचे रॅकेट?
मानसी ही मुले खरेदी-विक्रीचा व्यवहार किती दिवसांपासून करीत आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत. चौकशीतून आणखी काही माहिती मिळू शकते. - रामकृष्ण रेड्डी, जिल्हा महिला बालसंरक्षण अधिकारी