"पापा, तो मला मारतो", सॉफ्टवेअर इंजिनिअर कीर्तीने ७व्या मजल्यावरून मारली उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 10:39 AM2024-09-26T10:39:44+5:302024-09-26T10:42:39+5:30
पतीकडून सतत मारहाण आणि छळ होत असल्याने कंटाळून ३० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने आत्महत्या केली. सातव्या मजल्यावरून तिने उडी मारली.
राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये एका ३० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या आत्महत्येने खळबळ उडाली. महिलेने सातव्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवले. कीर्ती असे मयत महिलेचे नाव असून, सेक्टर ९२ मधील अन्सार हाईट्स या अलिशान सोसायटीमध्ये ती पतीसोबत राहत होती.
या प्रकरणात पोलिसांनी कीर्तीचा पती आणि सासरच्या मंडळीविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. कीर्तीचे वडील जगदीश सिंह याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१८ मध्ये झाले होते लग्न
कीर्ती नोएडातील एका आयटी कंपनीमध्ये काम करत होती. २०१८ मध्ये तिचे योगेंद्र (वय ३५) सोबत लग्न झाले होते. तो फरुखनगरमधील एका कंपनीत मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून काम करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्ती तिच्या पतीसोबत दोन आठवड्यांपूर्वीच अन्सार हाईट्समधील फ्लॅटमध्ये राहायला आले होते. त्यांनी हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. कीर्ती आणि योगेंद्रचे कुटुंब मथुरामध्ये राहतात. कीर्तीने सोमवारी (२३ सप्टेंबर) दुपारी १ वाजता फ्लॅटच्या गॅलरीतून उडी मारली. त्यातच तिचा मृत्यू झाला.
हुंड्यासाठी कीर्तीचा करत होते छळ
सेक्टर १० पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, कीर्तीला आरवी रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
कीर्तीचे वडील लष्करातून निवृत्त झालेले आहेत. कीर्तीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी लग्नात एक बलेनो कार, दागिने आणि इतर घरातील साहित्य दिले होते. लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी योगेंद्र आणि त्याच्या आईवडिलांनी हुंडा मागण्यास सुरूवात केली. वेळोवेळी मी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. योगेंद्र मद्यपान करून माझ्या मुलीला मारहाण करायचा.
कीर्तीच्या वडिलांनी असा आरोप केला आहे की, "21 सप्टेंबर रोजी मला कीर्तीने कॉल केला होता. योगेंद्र हुंडा आणि मूल होत नसल्याने त्याच्या आईवडिलांच्या सांगण्यावरून मारहाण करतो, असे सांगितले होते.
पोलिसांनी योगेंद्र, त्याचे आईवडील दिलीप आणि शारदा, तसेच त्याची बहीण डॉली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.